काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मागणी
schedule19 Nov 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: कोल्हापूर महापालिकेची सोळा नोव्हेंबर २०२६ रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा येत्या चार डिसेंबरपूर्वी घ्यावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते इंद्रजीत बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक अमर समर्थ, प्रविण सोनवणे, सचिन शेंडे यांनी महापौर निकम यांची भेट घेऊन सभा बोलाविण्यासंबंधी निवेदन दिले. तिसरी सुधारित प्रारुप विकास योजनेसंदर्भात कार्यपत्रिकेवरील विषय क्रमांक दहावर निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा चार डिसेंबर घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. तिसऱ्या सुधारित प्रारुपा विकास योजनेसंदर्भातील विषयास चार डिसेंबर २०२६ पूर्वी मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये विलंब झाल्यास यासंबंधी महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन निर्णय हे राज्य सरकारच्या अधीन होतील. यामुळे शहराच्य विकास नियोजनावर तसेच भविष्यातील विकास प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.असे निवेदनात म्हटले आहे.
………..
तहकूब सभा…अन् उलटसुटल चर्चा
महापालिकेची सोळा नोव्हेंबर रोजी सर्वसाधारणा सभा तहकूब झाली आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी विकासकामांना प्रशासनाकडून निधी उपलब्ध होत नाही असा आरोप करत सभा तहकूब केली होती. दरम्यान या तहकूब सभेवरुन उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्या सभेत प्रशासनाकडून तावडे हॉटेल ते गांधीनगरपर्यंतच्या अनधिकृत बांधकामाच्या वस्तुस्थितीसंदर्भातील अहवाल मांडण्यात येणार होता. दरम्यान ही बांधकामे नियमित करण्यासाठी विविध पातळीवर अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. समाधानकारक तोडगा निघू न शकल्यामुळे सभा घेऊन ’अर्थ‘?अशी भावना अनेक निर्माण झाली आहे. वाटाघाटी अर्धवट राहिल्यामुळे तावडे हॉटेलचा विषय चर्चेला येऊ नये यासाठी सभा तहकुबीचा निर्णय साऱ्यांनीच घेतला अशी चर्चा होत आहे.