लेखापरीक्षणाला सहकार्य, पण प्रसिद्धीसाठी महाडिकांकडून गोकुळची बदनामी कशासाठी ? चेअरमन विश्वास पाटलांचा पलटवार
schedule21 Jan 23 person by visibility 1000 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "शासकीय चाचणी लेखापरिक्षणाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. गोकुळ संघामार्फत दूध उत्पादकांसाठी भरीव व उल्लेखनिय कामगिरी होत आहे. संघाच्या कारभाराचे अवलोकन करून लेखापरिक्षकांनी अ वर्ग दिला आहे. त्यामुळे संचालक मंडळाने केलेल्या कामकाजावर विनाकारण आक्षेप घेऊन संघाची बदनामी करू नये. पत्रकार परिषदा घेऊन आपल्याला प्रसिद्धी मिळते पण अथक परिश्रमाने निर्माण झालेला गोकुळचा ब्रॅण्ड आणि इथल्या कार्यपद्धतीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. "अशा शब्दात गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या टीकेला पलटवार केला.
गोकुळच्या कामकाजावर आक्षेप घेत संचालिका महाडिक यांनी शासकीय चाचणी लेखापरीक्षा मागणी केली होती. गोकुळच्या लेखापरीक्षणाचे आदेश निघाल्यानंतर महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत गोकुळ मधील सत्ताधार्यांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले. दरम्यान चेअरमन पाटील यांनी पत्रक प्रसिद्धी देत महाडिक यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. महाडिक यांची टीका निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. महाडिक यांनी केलेल्या टीकेचे खंडन करताना प्रत्येक मुद्द्याची तपशीलवार माहिती दिली आहे. चेअरमन पाटील यांनी पत्रकार म्हटले आहे, " २०२१-२२ या वर्षाचा वैधानिक लेखापरिक्षण अहवालाचा दोष दुरूस्ती अहवाल वाचन करून खात्यास पाठविणेस संचालक मंडळाने मंजूरी दिलेली आहे. संचालक मंडळाच्या दोन्ही मिटींगमध्ये शौमिका अमल महाडीक हजर होत्या. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप किंवा हरकत घेतली नाही."
पाटील यांनी म्हटले आहे "संघाच्या दुधामध्ये वाढ करण्यासाठी, दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ अहोरात्र झटत आहे. संचालक मंडळाने वेळोवेळी दूध उत्पादकांचा विचार करून महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. याचा फायदा दूध उत्पादकांना नक्कीच झाला आहे व होत आहे. संघामार्फत दर दहा दिवसाला दूध संस्थाच्या बँक खात्यावर रूपये ७० कोटी दिले जात आहेत.दूध दरात ६ वेळा वाढ केलेली आहे. म्हैस दूध खरेदी दरामध्ये एकुण रूपये ८ प्रति लिटर वाढ केली आहे व गाय दुधामध्ये रूपये ९ प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. ग्राहक विक्री दरात १२ रुपये प्रतीलिटर वाढ केली आहे. म्हणजे ८०% रक्कम दूध उत्पादकांना दिलेली आहे. संघाने बचतेचे धोरण व पावडर व लोणी व्यवहारामध्ये वाढवा राहिल्याने संघाने दूध दर फरक आर्थिक २०२१-२२मध्ये जादा दिले आहे. त्याची होणारी रक्कम रूपये १0 कोटी उत्पादकांना दिलेली आहे.दूध दर फरक प्रतिलिटर २० पैसे प्रतिलिटर प्रमाणे जादा दिले आहे. संघाची दूध विक्री मध्ये १३.४५% इतकी वाढ झाली आहे. याचा अर्थ गोकुळ दुधाला ग्राहकांनी पसंती दिलेली आहे. जागतिक पातळीवर दूध उत्पादन घट झालेली आहे.त्यामुळे संघाच्या संकलनामध्ये घट दिसत आहे व पूर्ण भारतातील परिस्थिती हि तशीच आहे."
विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत गोकुळच्या ठेवी कमी झाल्याचा आरोप महाडिक यांनी केला. यासंबंधी चेअरमन पाटील यांनी "संघाच्या ठेवी कमी झालेचे मुख्य कारण संघाच्या दुग्धजन्य पदार्थाच्या साठ्यामध्ये वाढ झालेली आहे व संघाने वाशी येथे स्थावर मालमत्ता खरेदी केलेली आहे.त्यामुळे भविष्यात पॅकींग खर्चात बचत होईल." असे म्हटले आहे