आरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!
schedule11 Apr 26 person by visibility 76 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) बिल मंजुरीसाठी आर्थिक देवाणघेवाणीचा विषयावरुन आता बडया अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सीपीआरमधील लाल रंगाच्या डायरीत आर्थिक देवाणघेवाणीची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी आंदोलनाचा रेटा वाढल्यामुळे आरोग्य विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कार्यालयातील आर्थिक व्यवहारांच्या फाइलची तपासणी केली. लाल डायरीप्रकरणी चौकशीत दोषी असल्याचा ठपका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, तत्कालिन शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना निलंबित केल आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी नील कुमेरिये यांनी निलंबनाचे आदेश काढले. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी, ‘सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत आहे’असा आरोप करत आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात लाल रंगाची डायरी सापडली होती. या डायरीत अधिकाऱ्यांच्या नावावर काही रककम नोंदविल्याचे आढळले. डायरीत नोंदविलेल्या रकमा कोणत्या व्यवहाराच्या आहेत अशी विचारणा झाली. मात्र त्यावर अधिकाऱ्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर दिली नाही. अधिवेशनातही हा विषय उपस्थित झाला होता. या रकमेच्या नोंदीत अनियमितता आढळली. या नोंदी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र अंतिम जबाबदारी दोन्ही शल्य चिकित्सकांची होती त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.