बाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!
schedule10 Apr 26 person by visibility 122 categoryराजकीयक्रीडा
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. त्यांना सेवासुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने बाजार समितीची स्थापना झाली. मात्र या बाजार समितीत शेतकरी हितापेक्षा, कार्यकर्त्याना पद वाटपातच नेतेमंडळींना अधिक रस असल्याचे कामकाजावरुन दिसत आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तर वर्षाला सभापती व उपसभापतिपद बदलाचा खेळ सुरू आहे. प्रत्येकाला संधी या सुत्रानुसार दरवर्षी निवडीचे राजकारण दमदार सुरू आहे, मात्र सभापती व संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार अशा प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून उमटत आहेत. सगळेच संचालक काही स्वार्थी कारभार करत नाहीत. काही संचालकांनी नेहमीच बाजार समिती व शेतकरी हिताची बाजू मांडली आहे.
विशेष म्हणजे, बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष असे सगळे घटक सत्तेत आहेत. सहकारातून राजकारण नको म्हणत सोयीची मोट बांधली आहे. गेल्या तीन वर्षात तीन सभापती व उपसभापती झाले. पहिल्यांदा काँग्रेसचे भारत पाटील भुयेकर, दुसऱ्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रकाश देसाई व तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सुर्यकांत पाटील हे सभापती झाले. यापैकी सुर्यकांत पाटील यांना मुदतीपूर्वीच पदावरुन पायउतार व्हावे लागले. नेतेमंडळीची वक्रदृष्टी झाली आणि पाटील यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारत पाटील भुयेकर, प्रकाश देसाई, सुर्यकांत पाटील…या साऱ्यांची कामकाज करण्याची पद्धत वेगळी. अभ्यास करुन निर्णय घेण्याची भारत पाटील यांची खासियत. तर प्रकाश देसाई यांनी साऱ्यांना सोबत घेऊन कामकाज करण्याचा प्रयत्न केला.
तर सुर्यकांत पाटील यांनी सभापतिपदी म्हणून निवड झाल्यानंतर धडाडीने काम करण्यास सुरुवात केली. सेस चुकविणाऱ्यावर कारवाई, शाहू सांस्कृतिक मंदिराचे नूतनीकरण, पदोन्नती, इमारत बांधणीचा प्रस्ताव अशा विविध विषयावरुन सभापती म्हणून त्यांची गाडी सुसाट निघाली होती. मात्र साऱ्या संचालक मंडळांना सोबत घेऊन बाजार समितीचा गाडा हाकण्याऐवजी त्यांनी ‘एकला चलो रे…’म्हणत कामकाज केले. यामुळे संचालक मंडळात धुसफूस वाढली. नेतेमंडळीपर्यंत तक्रारी पोहोचल्या. आणि मुदत संपण्याअगोदरच त्यांच्या पदाला ब्रेक बसला. मागे वळून पाहताना या तीन सभापतींच्या नावावर भरीव कामगिरी काय ? असा प्रश्न आता शेतकरीच विचारत आहेत. बाजार समितीतील काही संचालक मंडळांना तर समिती म्हणजे खासगी मालमत्ता वाटते. नेतेमंडळीच्या मर्जीतील या संचालकांनी, शेतकरी हितापेक्षा स्वहिताचा कारभार केला. रस्ते दुरुस्ती असो की भाडेकरार….सारे कामकाज स्वकेंद्रित बनले आहे. ताजा विषय म्हणजे, तीन संचालकांनी बाजार समितीती ४५०० चौरस फुटाची जागा नातेवाईकांच्या नावावर घेतली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा भांडाफोड करत बाजार समितीचा कारभार चव्हाटयावर आणला. संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर, भारत पाटील यांना अपात्र करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मुळात बाजार समितीतही संचालक मंडळातील धुसफूस नवीन बाब नाही. एकमेकांवर कुरघोडी करताना कारभारही चव्हाटयावर आणला. कधी पडद्यामागे राहून तर कधी, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा साधण्याचा प्रयत्नही आता सभापतिपदाच्या निवडीवरुन सुरू आहे. मला नाही तर तुम्हालाही नाही असा डाव खेळला गेला. संचालकांच्या शह - काटशहाच्या राजकारणात बाजार समितीचा कारभाराचा बाजार उघड्यावर आला.
……………………..
सचिवांची जबाबदारी नेमकी काय
बाजार समितीत सचिवाची जबाबदारी मोठी. नियमानुसार कामकाज होते की नाही, चुकीच्या गोष्टी घडू नयेत यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असते. मात्र बाजार समितीतील गेल्या काही वर्षातील कामकाज पाहिला की सचिव ही संचालक मंडळाला सामील आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आस्थापनाशी निगडीत विषयातही त्यांनी पुढाकार घेऊन चुकीच्या गोष्टींना चाप लावला असे कधी घडले नाही. त्यांनी धडाडीचे निर्णय घेतले, कामकाज केला हे ऐकिवात नाही. मुळात बाजार समितीच्या सचिवपदाच्या निवडी सुद्धा नेतेमंडळीच्या सांगण्यानुसार होत आहेत. यामुळे निष्पक्ष आणि धडाडीच्या कामकाजाची अपेक्षा कशी करणार ? असे शेतकरी वर्गच म्हणत आहेत. हे चित्र बदलण्याची अपेक्षा सगळे घटक बाळगून आहेत. सध्या बाजार समितीच्या सचिवपदी तानाजी दळवी आहेत.