महापालिकेचे कर्मचारी २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून संपावर
schedule22 Apr 25 person by visibility 2030 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव महानगरपालिकेचे कर्मचारी हे २४ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अशी माहिती महानगरपालिका कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी दिली. या संपामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून ३५०० हून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. शिक्षण मंडळ व केएमटीचे कर्मचारी टप्प्याटप्प्याने या संपात सहभागी होतील असे भोसले यांनी सांगितले.
झाडू व सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नियुक्तीपत्रे द्यावीत, रिक्त जागा पदोन्नतीने व सरळ सेवेने भराव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, कचरा उठावसाठी पुरेशी वाहने द्यावीत, गणवेश त्वरित मिळावेत, हंगामी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक लाभ हवेत,ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे यासह २३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी महानगरपालिका कर्मचारी संघ प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसंबंधी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या कारणास्तव कर्मचारी संघाने ११ एप्रिल रोजी महापालिका प्रशासनाकडे संपाची नोटीस दिली होती.
कर्मचाऱ्यांचा इशारा, प्रशासनाचे आवाहन
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी (२१ एप्रिल) बैठक बोलावली होती. उपायुक्त पंडित पाटील यांच्या कार्यालयात बैठक झाली. कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जनरल सेक्रेटरी अजित तिवले, रवींद्र काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर उदासिनता दिसत असल्यामुळे कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा. नागरी सुविधावर परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी. रोजंदारी कर्मचारी, पात्र वारसांना नियुक्ती, पदोन्नती यासह अन्य मागण्यासंबंधी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे म्हटले आहे.