भागीरथी संस्थेतर्फे पंधरा वर्षात चार लाख महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण ! भविष्यात सांगली-सोलापुरात संस्थेचा कार्यविस्तार !!
schedule24 Jul 25 person by visibility 203 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनाव्यात, त्यांच्यामध्ये उद्यमशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने काम करण्यासाठी २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. संस्थेने गावागावात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत सबलीकरण केले. महिला उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले. विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मितीसह शेतीपूरक व्यावसायिक प्रशिक्षण दिले. गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख महिलांना मोफत व्यावसयिक प्रशिक्षणासह त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठेची सोय केली. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यकाळात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्व वाटचालीमध्ये आणि उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. खासदार महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभही महिलांना मिळवून दिला असल्याचे त्या म्हणाल्या. संस्थेच्या वाटचालीविषयी बोलताना अरुंधती महाडिक म्हणाल्या. महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, या हेतूने भागीरथी महिला संस्थेच्यावतीने गेल्या १५ वर्षात विविध प्रकारच्या उत्पादन निर्मितीसंबंधी शेकडो प्रशिक्षण शिबिरे घेतली. शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणामध्ये शेळीमेंढी पालन, कुक्कुटपालन, व्यावसायिक शेती, गांडूळ खत, गायी, म्हैशी पालन इत्यादी व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. भिमा कृषी प्रदर्शन मध्ये मोफत स्टॉल, वेगवेगळ्या संस्थाच्या प्रदर्शनात सहभाग करुन घेतले.
संस्थेच्यावतीने, शेळी वाटप हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये १६०० हून अधिक गरजू कुटुंबांना शेळया प्रदान करण्यात आल्या आहेत. या शेळयांचा वार्षिक विमाही उतरवण्यात येत आहे. भागीरथी संस्थेतर्फे वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांबाबत मार्गदर्शन करणारा, कळी उमलताना हा उपक्रम शाळा-महाविद्यालयाता राबविला. मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आली। भागीरथी ग्रंथालयाच्या २६ शाखा उघडून वाचन चळवळ गतीमान केली. तसेच काही वाचनालयांना पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले. भागीरथी महिला संस्थेतर्फे गेली १५ वर्षे झिम्मा फुगडी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते. संस्थेतर्फे १०० गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप झाले आहे. भविष्यातील योजना सांगताना महाडिक म्हणाल्या, भागीरथी संस्थेने स्वतःची वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि युटयूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोशल मीडियाद्वारे महिलांचे प्रबोधन, त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलांपर्यंत पोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच या वर्षभरात महिलांसाठी आरोग्य विषयक, बौध्दीक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. पत्रकार परिषदेला वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, पृथ्वीराज महाडिक, शरयू भोसले उपस्थित होत्या. जिल्हयातील महिलांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील ९६ ७३ ८१ ९२ ९२ किंवा भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्या ८४० ९९ ७५० ५० या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.