शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार
schedule12 Aug 25 person by visibility 101 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामार्फत दोन वर्षातून एकदा देण्यात येणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख रक्कम ५१ हजार, मानपत्र, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
अर्थशास्त्रात भरीव योगदान देणाऱ्या आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनने शिवाजी विद्यापीठाकडे एकत्रित निधी सुपूर्द केला आहे. पहिला पुरस्कार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा.सुखदेव थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.यंदा या पुरस्कारासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शोध समितीने अर्थतज्ज्ञ डॉ. जाधव यांची एकमताने निवड केली आहे. शोध समितीचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के आहेत. समितीमध्ये डॉ. महादेव देशमुख, प्रा. जे. ए. यादव, डॉ. विजय ककडे आणि डॉ. राहुल शं. म्होपरे यांचा समावेश आहे. पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर यांनी संयुक्तरित्या केले आहे.