अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापट
schedule07 Nov 26 person by visibility 69 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, शुक्रवारी ६ नोव्हेंबर २०२६ जोरदार निदर्शने केली. कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्यावर कारवाई करावी यासाठी त्यांनी मुख्य प्रवेशद्वारसमोर ठिय्या मारला. प्रवेशद्वार उघडून कार्यकर्त्यांनी सिनेट सभागृहाकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यावरुन कार्यकर्ते व सुरक्षारक्षकांत झटापट झाली. पोलिसही बंदोबस्तासाठी होते. अभाविपच्या आंदोलनामुळे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवला होता. यामुळे उशिरा आलेल्या सिनेट सदस्यांना अन्य मार्गे सभागृहात सोडण्यात आले. कुलसचिव शिंदे यांच्या नियुक्तीप्रकरणी अभाविपने तक्रारी केल्या होत्या. शिक्षण सहसंचालकांनी, त्यांच्यासंबंधीचा अहवाल उच्च शिक्षण संचालकांकडे सादर केला आहे. तर विद्यापीठ प्रशासनाकडून शिंदे यांच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी, शिंदे यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यांना तत्काळ पदमुक्त करावे यासाठी आंदोलन केले होते. जवळपास दोन तास कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारुन होते. दरम्यान अधिसभेची बैठक सुरू असल्याने बारा नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन मागण्याबाबत चर्चा करू असे कुलगुरू कामत यांनी सांगितल्याचे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कार्यकर्त्यांना कळविले.त्यानंतर आंदोलन स्थगित केले. आंदोलनात अॅड. अथर्व कुलकर्णी, प्रेम राजमाने, साक्षी पाटील, साहिल पाटील, अभय शेलार, श्रेयस चिकुर्डे, चैतन्य कुलकर्णी, तनिष्क दळवी, पीयूष मंत्री, श्रीनिवास विसापूरकर, पूर्वा कुलकर्णी, स्नेहल कोळी आदींचा सहभाग होता.