विकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूड
schedule08 Jun 26 person by visibility 38 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ विकासाच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन आणि कंगाल करण्याचा डाव रचला जात आहे,’ असा घणाघाती आरोप ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक पी. साईनाथ यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे आणि स्वागताध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही शेतकरी, शेती आणि कृषी संस्कृतीच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडत सरकारच्या धोरणांवर टीका केली. याप्रसंगी साहित्यिक डॉ. मोहन पाटील यांना ‘स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शेतकरी चळवळ कार्यकर्ते जयकुमार कोले यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारितामधला पी साईनाथ यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उद्घाटक पी. साईनाथ यांनी आपल्या भाषणात देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी वर्गासमोरील वाढत्या संकटांचा परखड आढावा घेतला. ते म्हणाले, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार आणि कार्पोरेट शक्तींच्या संगनमतातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आखला जात आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतीमधून माणसे बाहेर पडू लागली आहेत, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.”
संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांनी “शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर आपल्या जीवनाचा प्राण आहे. शेती ही आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. शेतकरी जगला तरच समाज जगेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये.’ स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. “महात्मा फुलेंचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुन्हा एकदा या सरकारवर उगारण्याची गरज आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प रेटले जात आहेत. गरज नसताना सुपीक शेती संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले.
दुपारच्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी’ आणि ‘हास होत चाललेली कृषी संस्कृती व कृषी सर्जनशीलता’ या विषयांवर परिसंवादात डॉ. गौतमपुत्र कांबळे, प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम, प्रसाद कुलकर्णी, विजय चोरमारे, नामदेव माळी, प्रा. संदीप जगताप आणि डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी विचार मांडले. निमंत्रितांच्या कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्वाती शिंदे-पवार अध्यक्षस्थानी होत्या. कवींनी शेती, माती, ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि सामाजिक वास्तव यांवर आधारित कविता सादर केल्या. यावेळी महावीर अक्कोळे डॉ. सुभाष अडंदडे, गोमटेश्वर पाटील, प्रा. शांताराम कांबळे, प्रकाश पोपळे , विठ्ठल मोरे, भगवान काटे , राजेंद्र गड्यान्नावर , प्रवक्ते अनिल पवार , घनशाम चौधरी , बापूसाहेब कारंडे , रविंद्र इंगळे , सुरेश काळे , अजित पोवार , राजाराम देसाई , आधी उपस्थित होते