नेता सर्वसामान्यांचा ! दादा कार्यकर्त्यांचा !!
schedule24 Nov 26 person by visibility 127 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: एखाद्या नेत्याची कार्यक्षमता, लोकप्रियता मोजमापाची विविध परिमाण आहेत. सतत कार्यमग्न असणं, लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देणं, विविध सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविणं, शहराच्या विकासाच्या योजनेसाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करणं आणि प्रशासनावर पकड ठेवून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं यासाठी लोकप्रतिनिधी हा अखंड धडपड करत असतो. या पंचसुत्रीचा मिलाफ साधत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरवासियांत ’सर्वसामान्यांचा नेता’म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. कार्यकर्त्यांत ते, ‘दादा’ म्हणून परिचित आहेत.
शिवसेनेत गेली चाळीस वर्षे सक्रिय आहेत. विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख, कोल्हापूर शहर प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी नागरी प्रश्नावर आंदोलन करत शिवसेनेचा धडाका निर्माण केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीनुसार त्यांनी काम काम केले. घरफाळा विरोधी लढा असो की, एलबीटी हटाव आंदोलन, टोल विरोधी संघर्ष असो की थेट पाइपलाइन योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा…प्रत्येक ठिकाणी क्षीरसागर हे आघाडीवर होते. कोल्हापूर शहरातून तिसऱ्यांदा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी केला. यावरुन त्यांची शहरवासियांशी जुळलेली नाळ स्पष्ट होते.
आमदार म्हणून काम करत असताना शहर विकासाच्या योजनेवर भर दिला. विरोधकांच्या टीकेची पर्वा न करत विकासकामांचा धडाका लावला. संघटनात्मक जाळे विणले. कोल्हापुरात कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी, रंकाळा संवर्धन व सुशोभिकरण, गांधी मैदानातील पाणी निचऱ्याचा प्रश्न सोडविणे, शहरातील तालीम संस्थांना मदत, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा अशा विविध कामांतून त्यांनी आपण एक सजग लोकप्रतिनिधी आहोत हे दाखवून दिले. गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत व उपचारासाठी चोवीस तास त्यांची यंत्रणा सक्रिय असते. १९८६ पासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या जे मंत्री, आमदार आहेत त्यामध्ये क्षीरसागर हे शिवसेनेतील सर्वात सिनीअर आहेत.पक्ष आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा, दिलेली जबाबदारी पार पाडणारा विश्वासू शिलेदार म्हणून ते शिवसेनेत ओळखले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. कामाचा धडाका, संघटनात्मक काम, पक्षासाठी जनाधार वाढविण्यात पुढाकार अशा विविध पातळीवर सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या या नेतृत्वाला आता राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे ते सोने करतील इतके निश्चित.