वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव – बसव पालखी सोहळा उत्साहात
schedule01 May 25 person by visibility 42 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, फुलांनी सजावट केलेली पालखी, आकर्षक विद्युत रोषणाई, धनगरी ढोल व झांजपथक अशा उत्साही वातावरणात शिव –बसव पालखी सोहळा निघाला. कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे या पालखी सोहळयाचे आयोजन केले होते. दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे बुधवारी (३० एप्रिल २०२५) कार्यक्रम झाले.
सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. शैलजा सावर्डेकर, विनोद सावर्डेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व वरदशंकर महापूजा झाली.बसवलिंग महास्वामी, उद्योजक सोमराज देशमुख यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. मठात प्रज्ञा माळकर यांचे ‘महात्मा बसवेश्वर यांचे जीवन कार्य व नव्या पिढीला संदेश’ या विषयावर व्याख्यान झाले. सायंकाळी अतिशय उत्साहात पालखी सोहळा निघाला. पालखी मिरवणुकीचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. दसरा चौक ते आईसाहेब महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महापालिका चौक येथून गवळी गल्ली मार्गे मिरवणूक दसरा चौकात आली.
कार्यक्रमात कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण प्रकाश सांगावकर, उपाध्यक्ष चंद्रकांत हळदे, सचिव सुनील गाताडे, चंद्रकांत स्वामी, सुहास भेंडे, चंद्रकांत नाशिपुडे, गुरुदेव स्वामी, राहुल नष्टे, व्ही.एस. पाटील, केतन तवटे, उदय दिवसे, कुमार मठपती उपस्थित होते. रात्री महाप्रसाद वाटप व सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम झाला.