उद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !!
schedule25 May 26 person by visibility 114 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सोमवारी वेगळेच नाट्य घडले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी व प्रख्यात अभिनेत्री नीलम शिर्के यांनी निवडणुकीतून माघार घेत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. नीलम शिर्के यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे राजकीय चर्चा चांगल्या रंगल्या होत्या.
उमेदवारी मागे घेण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना अभिनेत्री शिर्के म्हणाल्या, " मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून मी गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी परिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असा विचार मनात होता.
नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक जाहीर झाली आणि या निवडणूकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत सहभागी असणारे चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.
दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वतः मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते, तथापि अभिनेत्री प्रवर्गातून वर्षा उसगावकर यांनी अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळाले, मुळात वर्षा उसगावकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रिय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे, याचे देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे. सोमवारी सकाळी सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष भोसले आणि अभिनेत्री उसगावकर यांच्यासहित काही जेष्ठ रंगकर्मींशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. अभिनेत्री उसगावकरसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीतून माझी उमेदवारी मागे घेत आहे. तसेच वर्षा उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब मंगळवारी पूर्ण करण्यात येईल."