छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत असणारे जगातील एकमेव शिल्प कर्नाटकातील यादवाडमध्ये
schedule02 Jan 21 person by visibility 368 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1, कोल्हापूर : मराठा साम्राज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आज अनेक ठिकाणी पहायला मिळतात. परंतु, याच रयतेच्या राजाचे त्यांच्या हयातीतच मल्लाबाई देसाई यांनी बनवलेले पहिले शिल्प आजही कर्नाटकातील यादवाडमध्ये पहायला मिळते.
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी मित्र डॉ. अलोक जत्राटकर याने या संदर्भातील व्हिडीओ फेसबुकवर रविवारी अपलोड केला आणि तो पाहिल्यानंतर त्याला थेट फोन करुन त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर त्याने त्यावर स्वतंत्रपणे ब्लॉगही लिहिला. यातून यादवाडला कधी एकदा भेट देतोय असं झालं. तात्काळ यादवाडला भेट देऊन या शिल्पाचे दर्शन घेतले शिवाय या मागील ऐतिहासिक प्रसंगाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
बेळगावच्या पुढे धारवाडला जाताना महामार्गावर असणाऱ्या धारवाड आय. आय. टी. संस्थेनंतर डावीकडे नरेंद्र फाटा लागतो. तेथून वळणा – वळणाच्या रस्त्याने अवघ्या साडेबारा किलोमिटर अंतरावर यादवाड हे गाव वसले आहे. गावात पोहचल्यानंतर अगदी डाव्या हातालाच काही पावलांवरच हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला हे शिल्प छोटेखानी मंदिरात सध्या बसवण्यात आले आहे. या मंदिराच्या कमानीवर ‘छत्रपती शिवाजी’ असे शब्द मराठीत लिहिलेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या विजयानंतर परत येत असताना १६७७ मध्ये वाटेत असणाऱ्या बेलवडेच्या येसाजी प्रभू देसाई याने राजांचे अन्न धान्य वाहून नेणारे बैल पळवून नेले. हा उल्लेख सभासद बखरीत आहे. या देसायाला समज देऊन बैल परत आणण्याची जबाबदारी सखुजी गायकवाड या सरदारावर महाराजांनी सोपविली. मात्र बैल परत करण्याऐवजी देसाईने लढाई सुरु केली. या लढाईत देसाई मारला गेला. मात्र, त्याची पत्नी मल्लाबाई हिने २७ दिवस लढा देत गढी राखून ठेवली. अखेरीस अन्न-धान्य, दारुगोळा संपला तेव्हा तीने आपल्या सैन्यांसह सखुजी गायकवाड यांच्या सैन्याबरोबर झुंज दिली. शेवटी तिचा पराभव झाला. या विषयी राजापूरच्या एका इंग्रज व्यापाराची २८ फेब्रुवारी १६७८ रोजीची नोंदही जदुनाथ सरकार यांनी आपल्या ‘शिवाजी ॲन्ड हीज टाईम्स’ या ग्रंथात घेतली आहे. पराभूत मल्लाबाई सखुजीच्या हाती सापडली.
सखुजी गायकवाड या सरदाराने मल्लाबाईला कैद करुन वाईट रितीने वागवल्याबद्दल महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला मानवलीला कैदेत ठेवले असा संदर्भ तारीख- ई-शिवाजी या बखरीत आढळतो. ‘शकुजी (सखुजी, सखोजी) याची परद्वारावर नजर याजकरिता त्याचे डोळे काढीले’ असा उल्लेखही ९१ कलमी बखरीच्या एका प्रतीत आढळतो.
महिलांना शिक्षा करावयाची नाही असा महाराजांचा नियम असल्याने त्यांनी आपल्या समोर हजर केलेल्या मल्लाबाईंची मुक्तता करुन वस्त्राभूषणे देऊन सावित्री नावाने त्यांना गौरविले. बेलवडी बरोबरच आणखी दोन गावेही इनाम दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्र.न. देशपांडे संपादित २००२ च्या आवृत्तीत मल्लाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्पांकन बेलवडीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाल्याचे आढळते. त्यापैकीच सध्या यादवाडमध्ये अस्तित्वात असणारे हे एक शिल्प आहे.
सध्या यादवाडमध्ये असणारे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिलदारपणाची साक्ष म्हणून मल्लाबाईंनी तयार करुन घेतले. सुमारे चार फूट उंचीच्या या शिल्पाचे प्रामुख्याने दोन भाग दिसतात. पहिल्या वरच्या भागात कोरीव खांब, पोपट हा पक्षी आणि लतावेलींची सुंदर महिरप कोरण्यात आली आहे. त्यामध्ये दिग्विजयी सम्राटाला साजेशी शिवाजी महाराजांचे अश्वारुढ शिल्प कोरण्यात आले आहे. लांब पायघोळ पोशाख, जिरेटोप, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. पुढे मागे भालदार चोपदार सैनिक आहेत. शिरावर छत्र आहे. पायाशी एक श्वान दिसतोय.
खालच्या एक चतुर्थांश भागात महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक लहान बाळ असून त्याला ते भरवत आहेत. समोर मल्लाबाई वाटी घेऊन उभ्या आहेत, असे शिल्प कोरण्यात आलेले आहे. हे मूल मल्लाबाईंचे असून, त्याच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी त्यांना दोन गावांच्या इनामासह बेलवडी परत केल्याचे सांगितले जाते. या प्रसंगात एक सैनिक पाण्याची सुरई घेऊन समोरील बाजूस उभा आहे. महाराजांच्या मागे एक धनुर्धारी स्त्री सैनिक उभी असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरुन मल्लाबाईंच्या सैन्यदलात स्त्री सैनिक अथवा अंगरक्षक असावेत असे दिसते.
हे शिल्प कोरीव कामाचा उत्तम नमुना असून महाराजांच्या हयातीमध्ये मल्लाबाईंनी करवून घेतलय, हे अत्यंत महत्वाचे आहे. यादवाड ग्रामस्थांनी चांगल्या पध्दतीने जतन केलेल्या या शिल्पावर बाजुच्याच हनुमान मंदिरात येणारे भक्त तेल, साखर वाहतात. त्यामुळे या शिल्पाची झिज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी करुन सन्मानाने पाठवणी करणाऱ्या आणि मल्लाबाईंना मुलाच्या दूधभातासाठी इनाम देणारा प्रसंग असो, रांझ्याच्या पाटलाला आणि सखुजी गायकवाडला केलेली शिक्षा असो यामधून महाराजांचे स्त्रीविषयक आदरभाव, सन्मानाचे धोरण दिसून येते. मराठा साम्राज्याच्या संस्थापकाच्या दिलदारपणाचे आणि आदरभावाची साक्ष देणारे हे अनमोल शिल्प पुढच्या पिढीलाही गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणारे आहे.
लेखन-प्रशांत सातपुते ( जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर)
………………………