गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!
schedule01 Oct 26 person by visibility 82 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जागा वाटप संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये महायुतीच्या नेते मंडळींची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा, भारतीय जनता पक्षाने आठ, शिवसेनेने आठ तर जनसुराज्यशक्ती पक्षाने तीन जागांची मागणी केली. गोकुळच्या संचालक पदाच्या एकूण 25 जागा आहेत. मात्र घटक पक्षाने मागणी केलेल्या जागांची संख्या 29 पर्यंत गेली. त्यामुळे बैठकीत जागावाटपा संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत महायुतीतील नेते मंडळीनी आपआपल्या अपेक्षित जागा सांगितल्या. आता मुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.
सध्या गोकुळ निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र जिल्हा पातळीवर झालेल्या बैठकीत महायुतीतील नेते मंडळींची जागा पाठवा संदर्भात एकमत झाले नाही. जागा वाटपा संबंधी बुधवारी मुंबईत बैठक आयोजित केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेते मंडळींची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दहा जागा मागितल्या. मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपसाठी आठ जागांचा प्रस्ताव ठेवला तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेला आठ जागा हव्यात असे सांगितले. या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या या संदर्भात एकमत होऊ शकले नाही त्यामुळे आता पुन्हा बैठक होणार आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत दरम्यान मुंबईतील बैठकीला आमदार अमल महाडिक, माजी आमदार के पी पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.