साहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रम
schedule12 Nov 26 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईआणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने साहित्यिक, चित्रपट कथालेखक आणि नाटककार शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शंकरपट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
शंकर खंडू पाटील यांनी साहित्य, चित्रपट आणि नाट्यलेखनाच्या क्षेत्रात आपल्या लेखनातून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या साहित्यिक आणि कलात्मक कार्याचे स्मरण व्हावे, तसेच त्यांच्या लेखनाचा आणि विचारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक नामदेव माळी यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ‘शंकर खंडू पाटील : व्यक्ती आणि कर्तृत्व’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात शामरावअण्णा पाटील, डॉ. विजय चोरमारे आणि डॉ. रफीक सूरज सहभागी होणारआहेत.
कार्यक्रमात अभिनेता आनंद काळे यांचे कथा अभिवाचन होणार असून, कथाकार हिंमत पाटील कथाकथन सादर करणार आहेत. परिसंवाद, कथा अभिवाचन आणि कथाकथन अशा विविध साहित्यिक उपक्रमांतून शंकर खंडू पाटील यांच्या साहित्यविश्वाचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक, नाट्य आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे, कार्याध्यक्ष प्रा. दि.बा. पाटील यांनी केले आहे.