एमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावर
schedule08 Sep 26 person by visibility 26 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात तरुणाई सोमवारी, सात सप्टेंबर २०२६ रस्त्यावर उतरली. समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीतर्फे आंदोलन आयोजित केले होते. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला.पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
‘हक्कांसाठी लढणं आमचा धर्म आहे, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना शिक्षा द्या, पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे’ असे फलक हाती घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलनात जॉर्ज क्रूझ, श्वेता परुळेकर, शुभम शिरहट्टी, सारिका घुगे, अरुण पाटील, शुभम यादव, बाबासाहेब माने, विवेकानंद पाटील, ओंकार पाटील, साक्षी कुसळे, राहुल इंगळे, अनिकेत पाटील, प्रेम चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी होते. शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन दिले.