रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी
schedule21 Sep 26 person by visibility 108 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यावर दोन गुन्हे दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक का करण्यात आली नाही असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी, इंगवले यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करुन तत्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली. शक्ती भोसलेला मारहाण व गडहिंग्लज येथील खुतबुद्दीन शेख यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी इंगवले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.इंगवले यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक नियुक्त केले असल्याचे समजते. मात्र इंगवले यांचे सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते कुठून व्हिडिओ व्हायरल करतात, त्यांना कुणी आश्रय दिला आहे त्या साऱ्यांची चौकशी करावी. अशी मागणी चव्हाण यांनी केली. इंगवले यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये शरद कोराणे यांना कारागृहात एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन मारल्याचा आणि तत्कालिन पोलििस अधिकाऱ्यांशी संगनमत करुन सम्राट कोराणे याना खोटया प्रकरणात अडकविल्याचे म्हटले आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला शिवसेनचे पदाधिकारी शिवाजी जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, हर्षल सुर्व, दुर्गेश लिंग्रस, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, कमलाकर जगदाळे आदी उपस्थित होते.
.............
मला बदनाम करण्याचे षडयंत्र….इंगवले
माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरला झाला आहे. यामध्ये त्यांनी, ‘मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझ्यावर होणारे आरोप खोटे आहेत. व्हिडिओ एडिटिंग करुन मला गुंतविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहे. माझी कसलीही चौकशी करावी. २०२१ मध्ये शरद कोराणे वारले. कोराणे यांचा घातपात झाला नाही. त्यांना कसलेही इंजेक्शन दिले नाही. आता प्रश्न उपस्थित करत आहेत. मी कधीही खंडणी मागितली नाही. मला खंडणी दिलेले व्हिडिओ दाखवावेत. ’असे म्हटले आहे.