शिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदन
schedule08 Sep 26 person by visibility 22 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून त्यातील वक्तव्यांच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी, तसेच माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्याविरोधातील विविध तक्रारी व दाखल प्रकरणांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका शिवसेना गटाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात उपमहापौर अक्षय जरग, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेवक अजय इंगवले, स्वरूप कदम, वैभव माने, तात्या खेडकर, नेपोलीयन सोनुले, करण जाधव आणि अशपाक आजरेकर आदींचा सहभाग होता. शिवाजी पेठेतील शरद कोराणे यांच्या मृत्यूबाबत कथित कबुली दिल्याचा दावा असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील आवाज रविकिरण इंगवले यांचा असल्याचा दावा करण्यात येत असून, या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी शिवसेना महापालिका गटाने केली आहे. दरम्यान माजी नगरसेवक इंगवले यांनी व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाजात मोडतोड करण्यात आली आहे. त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे तसेच त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये राज्य सरकार व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात जी वक्तव्य केली, यामुळे त्यांच्या परिवाराची जी हानी झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे इंगवले यांनी म्हटले आहे.