शिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !
schedule26 Sep 26 person by visibility 199 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काटकसरीचा कारभार व नियोजनबद्ध वसुलीमुळे कोल्हापुरातील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला तीन कोटी सहा लाख रुपयांहून अधिक नफा झाला आहे बँकेने यंदा सभासदांना आठ टक्के प्रमाण लाभांश वाटप करण्याचे निश्चित केले आहे.’अशी माहिती बँकेचे चेअरमन बाबुराव धोंडाप्पा परीट यांनी पत्रकार परिषदेत दिली. सभासदांचा बँकेवरील विश्वास वाढत असून आज अखेर ४४२ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. शिवाय बँकेने कर्ज मर्यादेत वाढ करुन ५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, (२७ सप्टेंबर २०२६) होत आहे. आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे दुपारी एक वाजाता सभेला प्रारंभ होईल. या सभेच्या पूर्वसंध्येला सत्तारुढ संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेत बँकेच्या प्रगतीचा, विविध योजनांची माहिती दिली. त्याचवेळी विरोधकांकडून, बीडीडीआरमधील निधी, अमृत संजीवन योजना, नोकरभरती, संचालक संख्येत वाढ यावरुन झालेल्या आरोपांचा सत्तारुढ संचालकांनी समाचार घेतला. बँकेचे व्हाइस चेअरमन गजानन कांबळे, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळकृष्ण हळदकर, सुरेश कोळी, शिवाजी रोडे –पाटील, वर्षा केनवडे, पद्मजा मेढे, अमर वरुटे, रामदास झेंडे, नंदकुमार वाईंगडे, गौतम वर्धन, सदानंद पाटील, तुकाराम मातले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम आदींच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली.
बुडीत कर्ज निध अर्थात बीडीडीआरमधून साठ लाख रुपये नफ्याला घेतले आहेत. तेव्हा हा नफा अयोग्य व चुकीचा आहे का याचे उत्तर मिळावे असे आव्हान विरोधकांनी केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ‘२०२४ २५ मध्ये एनपीए रक्कम आठ कोटी ५० लाख व २०२५ २६ मध्ये सहा कोटी तेरा लाख यामुळे दोन कोटी ३७ लाखाने एनपीए खाली आला. परिणामी त्याला लागणारी तरतूद कमी झाली. म्हणून आरबीआयच्या २८ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रानुसार साठ लाख रुपये जादा निधी नफ्याकडे वर्ग केला. थकबाकी वसुली केली ही आमची चूक झाली का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना केला. चेअरमनपदाच्या खांडोळीवरुनही पलटवार करताना ‘मागील संचालक मंडळाने सतरा दिवसाचा चेअरमन केला होता.’याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधले.
चेअरमन परीट म्हणाले,‘प्राथमिक शिक्षकांच्या राज्यभरात चार बँका आहेत. यामध्ये कोल्हापुरातील शिक्षक बँकेचा कारभार आणि प्रगती अव्वलस्थानी आहे. सत्तारुढ संचालक मंडळ सातत्याने सभासदांना लाभांश देत आहे याचा आपणाला आनंद आहे. निवडणुकीच्या कालावधीत सभासदांना जी आश्वासने दिली, त्या साऱ्याची पूर्तता करण्यावर आमचा भर आहे. दोन अंकी लाभांश आणि कर्जावरील व्याज दर एक अंकी…ते सुद्धा पूर्ण होईल. मागील संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजात अनेक खड्डे तयार केले होते, ते खड्डे नसते तर सगळया तरतुदी पूर्ण करुन आता दोन अंकी लाभांश दिला असता. तरतुदी म्हणजे बँकेचा कणा असतो. त्या सगळया तरतुदी करण्यावर आमचा भर आहे. ’असे त्यांनी सांगितले.
कर्ज वाटप कमी होत असल्याच्या विरोधकांच्या मुद्यावर चेअरमन परीट म्हणाले,‘शिक्षक बँकेचे ३८० सभासद निवृत्त झाले आहेत. त्याचा थोडाफार परिणाम झाला आहे. मात्र संचालक मंडळाने कर्जवसुली प्रभावीपणे राबविली. अमृत संजीवन योजनेंतर्गत मयत सभासदांच्या वारसांना चार कोटी ८७ लाख रुपयांची मदत झाली.’ पत्रकार परिषदेला शिक्षक नेते रविकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगले, जोतिराम पाटील, प्रमोद तौंदकर, तानाजी मेढे, शरद केनवडे आदी उपस्थित होते.
…………………….
मोघम आरोप करु नका, तर संबंधित संचालक राजीनामा देतील
संचालक निंबाळकर यांनी ‘बँकेची व्यवसाय वृद्ध व सभासदांना न्याय देण्यासाठी संचालक संख्येत वाढ दुरुस्तीचा पोटनियम मंजुरीसाठी सभेसमोर मांडल आहे. यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार सभासद व सभेला आहे. सत्तारुढ संचालक मंडळाचा कारभार पाहून सभासद शंभर टक्के मान्यता देतील याची खात्री आहे.’असे सांगितले. तसेच विद्यमान संचालक व अथवा चेअरमन व माजी चेअरमनांच्या घरात बँकेचा एकही कर्मचारी काम करत नाही. विरोधकांनी ते सिद्ध करुन दाखवावे, संबंधित संचालक राजीनामा देईल. कोणीही मोघम आरोप करु नयेत.
……………..
विरोधक काय मांडतात त्यांनाच कळत नाही
संचालक एडके यांनी समाचार घेतला. एडके म्हणाले, ‘विरोधक काय मांडतात तेच त्यांना कळत नाही. मुळात २०२२ मध्ये तत्कालिन संचालकांनी बुडीत कर्ज निधीमधून कोणतीच रक्कम नफ्यात घेतली नव्हती. त्यांनी २०२० व २०२१ मध्ये बीडीडीआमधून काढली होती. माहिती न घेता वाटेल ते बोलत असतात.’