मंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर यांची मागणी
schedule22 Aug 26 person by visibility 31 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जनसेवेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत हजारो गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे आमदार व शिक्षक एकत्रितपणे साकडे घालणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांनी केले.
मिरज येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित शिक्षक व आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“शिक्षक, शिक्षण संस्था आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यासारख्या जनसेवकाचा आवाज विधान परिषदेत पोहोचणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले काम सर्वांसमोर आहे. गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यापासून ते शिक्षक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचा जनसेवेचा प्रवास उल्लेखनीय आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी सांगली संपर्कप्रमुख योगेश जानकर, महानगरप्रमुख मोहन वनखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षण सेनेचे बापूसाहेब अडसूळ यांनी प्रास्ताविक केले.