अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप
schedule15 Jul 26 person by visibility 633 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डोळयांत आसवांची दाटी…मनात असंख्य आठवणी …हळहळणारे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते अन् ‘अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे’चा घोष अशा शोकाकुल वातावरणात राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांना बुधवारी (१५ जुलै २०२६) अखेरचा निरोप देण्यात आला. ‘काका’ या नावांनी परिचित असलेल्या भरत लाटकर यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान केले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडे सुपूर्द करताच उपस्थितांनी हात उंचावत ‘राष्ट्र सेवा दल बढाना है, परिवर्तन लाना है ’हा नारा आणखी बुलंद केला. त्याचवेळी जनसमुदायातून, ‘लाटकर काकाका अधुरा काम कौन पूरा करेगा, हम करेंगे- हम करेंगे’ अशा घोषणा देत परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष, महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांचे मंगळवारी ( १४ जुलै २०२६) निधन झाले. मृत्यूसमयी ते 88 वर्षाचे होते. हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमधून बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव कोरगांवकर हायस्कूल येथे आणले. कोरगावकर हायस्कूलच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने ’सदैव सैनिका पुढे जायचे…’ही प्रार्थना म्हटली. तत्पूर्वी राष्ट्र सेवा दलाचा ध्वज त्यांच्या पार्थिवावर परिधान करण्यात आला. कोरगावकर हायस्कूल आणि आंतरभारती शिक्षण मंडळाशी जुळलेली त्यांची नाळ कायम राहिली. जवळपास तीन दशकाहून अधिक काळ कोरगावकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून् त्यांनी काम केले होते. याच शाळेत आणि मैदानावर राष्ट्र सेवा दलाच्या शाखा चालविल्या. प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. त्यांच्या मुशीत घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. डबडबलेल्या डोळयांनी अंत्यदर्शन घेताना अनेकांना हुंदका अनावर होत होता. लाटकर यांच्यासोबत शिक्षक म्हणून काम केलेले सहकारी भावनाविश झाले. ज्या मैदानावर त्यांनी बौद्धिक शिबिरे घेतली, खेळ घेतले, त्याच मैदानावर त्यांना श्रद्धाजंली वाहणारा फलक पाहताना अनेकांना गहिवरुन आले.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरगावकर हायस्कूल येथून पार्थिव त्यांच्या निवासस्थानाकड नेण्यात आले. कोरगावकर हायस्कूल, सदर बाजार, विचारेमाळ मार्गे नक्षत्र पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आले. यावेळी कुटुंबांतील सदस्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांचे चिरंजीव शैलेश, राजेश व कुमार लाटकर व कुटुंबांतील सदस्य सारेच शोकमग्न. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्ते त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवित होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, शिक्षक, विविध संस्थांचे प्रतिनिधींनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय. पाटील, भैया माने, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राष्ट्र सेवा दलाचे बाबा नदाफ, विजय भोगण, वसंत पाठक, रियाज मगदूम, अशोक चौगुले, इंद्रायणी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, हसन देसाई, उदय नारकर, राजन गवस, डॉ. बी. एम. हिर्डेकर, व्यंकाप्पा भोसले, संग्रामसिंह निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, अर्जुन माने, संजय मोहिते, अमर समर्थ, वैभव माने, विनायक फाळके, विशाल चव्हाण, सचिन शेंडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर, सतीश कांबळे, मारुती माने, डॉ. प्रविण कोडोलीकर, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, प्रकाश पाटील, दिलीप शेटे, बाळकृष्ण मेढे, कैलास गौडदाब, रमेश पोवार, सचिन पाटील, लाला भोसले, रमेश पुरेकर, बाळासाहेब मुधोळकर, सुजय पोतदार, सुभाष रामुगडे, महेश जाधव, महेश बराले, राजू साबळे, तौफिक मुल्लाणी, सीमा पाटील, रघुनाथ कांबळे, महेश उत्तुरे, नितीन आडके, शिवानंद बनछोडे, अभय तेंडुलकर, सागर यवलुजे, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, शिक्षक संजय कळके,नगरसचिव सुनील बिदरे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, माजी नगरसचिव उमेश रणदिवे, प्राचार्य महादेव नरके, दिलीप देसाई, उदय गायकवाड, कुलदीप शिंगटे, विशाल शिराळकर, कुणाल शिंदे, आपचे उत्तम पाटील यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले.
........................
रविवारी कोरगावकर हायस्कूल येथे शोकसभा
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी कोरगावकर हायस्कूल येथे शोकसभा आयोजित केली आहे. दुपारी दोन वाजता शोकसभा होणार आहे.