ग्रंथ माणसाला विवेकी बनवतात : डॉ. बी. एम. हिर्डेकर
schedule03 Aug 26 person by visibility 62 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ ग्रंथ हे केवळ ज्ञानाचे साधन नसून ते माणसाला विचारशील, संवेदनशील आणि विवेकी बनवतात. म्हणूनच ग्रंथ हे जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत,’असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या हिंदी विभागातर्फे आयोजित "ग्रंथ हेच गुरु" या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, दिलीप मोहाडीकर, प्रा. डॉ. महावीर पाटील, श्रीमती स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. हिर्डेकर म्हणाले की, ‘ गुरु आयुष्यात जे काही देऊ इच्छितात, त्याचे शाश्वत रूप म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे प्रत्येकाच्या आयुष्यातील निःशब्द सहप्रवासी आहेत. साहित्याचे वाचन करताना लेखकांची आत्मचरित्रे, चरित्रे आणि वैचारिक साहित्य यांचाही अभ्यास केला पाहिजे. त्यातून संवेदनशीलता, समाजभान, जनभान आणि मूल्यदृष्टी विकसित होते. तुकाराम, कबीर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई चौधरी, वि. स. खांडेकर, ग्रेस आणि शेक्सपिअर यांसारख्या साहित्यिकांचे लेखन प्रत्येकाने वाचले पाहिजे. पुस्तके सत्यशोधन, सौजन्य, विवेक आणि सृजनशीलतेचे संस्कार घडवितात.’
केंद्र संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले, ‘ ग्रंथ हे व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारे खरे गुरु आहेत. डिजिटल युगातही वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके आपल्या संग्रही ठेवून नियमित वाचनाची सवय विकसित केली पाहिजे. ग्रंथांमधूनच ज्ञानाबरोबर मूल्यसंस्कार आणि जीवनदृष्टी प्राप्त होते. यामुळे त्यांचे महत्त्व अधिक आहे.’ डॉ. संजय चोपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रसाद दावणे यांनी आभार मानले.