नागनाथअण्णा नायकवडींच्या रचनात्मक कार्यातून प्रेरणा घेऊन काम करीत राहणे ही त्यांना श्रध्दांजली : वैभव नायकवडी
schedule10 Sep 22 person by visibility 538 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी: स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सातारचे प्रतिसरकार सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला आहे. या लढ्यात अग्रभागी असलेल्या डॉ.नागनाथअण्णा नायकवडी स्वातंत्र्यापूर्व काळात संघर्षात्मक तर स्वातंत्र्यानंतर रचनात्मक काम केले. स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी नागनाथअण्णांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. या क्रांतिवीरांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन विधायक काम हाती घेऊन राष्ट्र घडविण्यासाठी कार्य करणे ही या स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली असणार आहे.”असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी केले.
पद्मभूषण, क्रांतिवीर, डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी यांनी धुळे खजिना लूट, शेणोली पे ट्रेन लूट अशा अनेक क्रांतिकारी चळवळीतून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. म्हणून त्यांना अटक करून सातारा येथील जिल्हा कारागृहात डांबून ठेवले होते. तेथून बाहेर पडण्याच्या उद्देशाने नागनाथअण्णांनी १० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेल फोडून पळाले होते. या अतुलनीय शोर्याच्या स्मृति म्हणून सातारा येथे साजऱ्या होणाऱ्या ७८ व्या 'शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
सातारा कारागृह उपअधीक्षक शामकांत शेडगे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, हुतात्मा दूध संघाचे व्हाईस चेअरमन भगवान पाटील, शिराळा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब नायकवडी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर उपस्थित होते.
बाळासाहेब नायकवडी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा, क्रांतिअग्रणी जी.डी बापू लाड यांच्या कार्याचे आणि विचारांचे आपण वारसदार आहोत. या विचारांवर निष्ठा ठेवून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे म्हणता येईल.
विजय मांडके यांनी प्रास्तावक केले. गणेश दुबळे यांनी आभार मानले. मानले. या कार्यक्रमाला श्रमिक मुक्ती दलाचे नेते चैतन्य दळवी, अॅड राजेंद्र गलांडे, हुतात्मा संकुलातील शिक्षक, संस्थांचे पदाधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.