निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !
schedule22 Dec 25 person by visibility 104 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल आणि मुरगूड नगरपालिकेतील निकालानंतर माजी खासदार संजय मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. दोघांनीही एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केला. या दोन नेत्यांमधील कलगीतुरा कागलमधील गटातटाच्या राजकारणाच्या संघर्षाची धार तीव्र करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कागलमध्ये मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीने विजय मिळवला. मुरगूडमध्ये माजी खासदार मंडलिक व प्रविणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने मंत्री मुश्रीफ व राजे गटाचा पराभव केला.
नगरपालिका निकालानंतर माजी खासदार मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. मंडलिक म्हणाले,‘ मंत्री मुश्रीफ हे राजकारणात त्यांना योग्य वाटेल त्यावेळी काही जणांना जवळ करतात. नको असेल तेव्हा लांब करतात. जिल्हा बँकेतील राजकारणात ते नेमके असेच वागले. माझ्या मुलाचा पराभव केला. त्यांनी पुढील राजकारणात मंडलिकाचा अडसर वाटत असला पाहिजे. आपल्याला वाटेल त्याला बरोबर घ्यायचे, नको असेल तर बाजूला करायचे ? येथून पुढे मात्र मुश्रीफांना वाटेल तसे वागता येणार नाही. ते काय हुकूमशहा लागून गेले काय ? त्यांच्या सोयीच्या राजकारणाने महायुती होणार कशी ? समरजितसिंह घाटगे व मंत्री मुश्रीफ यांची युती जनतेला पटली नाही. कागल पालिकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवारच मिळणार नाहीत असे ते सांगत होते. आम्ही पॅनेल केले, उमेदवार दिले. त्या उमेदवारानी ३३ टक्के मते घेतली. मुरगूडमध्ये आम्ही विजयी ठरलो. चार ठिकाणी यश मिळाले नाही. त्याचेही चिंतन करू.’
मंडलिक यांनी केलेल्या टीकेला मंत्री मुश्रीफ यांनी जोरदार उत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, ‘ मी काही हिटलर नव्हे. मी गोरगरीब जनतेचा सेवक आहे, जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमावर शून्यातून मोठा झालेला मी कार्यकर्ताच आहे. त्यांना खरे दुख मी आणि समरजीतसिंह घाटगे एकत्र आल्याचे झाले असावे. त्यांची ती जखम अजूनही जाईनाशी झाली आहे. भविष्यात आपलं काय होईल या भीतीतूनच हे उद्गार आले असावेत. कोणाही बापजाद्याची पुण्याई आपल्या पाठीशी नाही. ना वडील आमदार, ना खासदार- मंत्री. एका सामान्य कुटुंबातून वर आलो आहोत. जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर मोठा झालेला मी कार्यकर्ता आहे. हे भान मी नेहमीच माझ्या मनामध्ये ठेवलेले आहे. त्यामुळे मी कधीच माझ्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. गेली वीस-बावीस वर्षे मी मंत्री आहे. बोलण्यात, चालण्यात, वागण्यात कधीही अहंभाव दाखविला नाही आणि कधीही उतलो- मतलो नाही. समाजकारणात आणि राजकारणात गेली ४० वर्षे मी आहे.’