७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!
schedule01 Sep 26 person by visibility 33 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रारुप कच्चा मतदार यादीतील ७८९ दूध संस्था अपात्र ठरल्या.विभागीय उपनिबधंक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी सोमवारी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील निकाल जाहीर झाला. दरम्यान विभागीय उपनिधकांच्या या निर्णयाविरोधात प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक होत ताराबाई पार्क येथील दुग्ध विकास विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. संस्था का अपात्र ठरविल्या याचा जाब विचारताना काही प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषेचा वापर केला. अपात्र ठरलेल्या संस्थामध्ये कागल, राधानगरी आणि करवीर तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे. दूध संस्थांचे प्रतिनिधी रात्री उशिरापर्यंत दुग्ध विकास विभागाच्या कार्यालय परिसरात थांबून होते.
गोकुळच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या यादीमध्ये ४८९७ संस्थांचा समावेश होता. या यादीवर १७४० हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर गेले काही दिवस दुग्ध विकास विभागात सुनावणी झाल्या.विभागीय उपनिबंधक या सुनावरी सोमवारी निकाल देणार होते. त्याकडे प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधीसह गोकुळच्या माजी संचालकांचे लक्ष होते. दिवसभर, दुग्ध विकास विभागाच्या कार्यालयात प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींची ये जा सुरू होती. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, अजित नरके, एस. आर. पाटील, प्रा. किसन चौगले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे हे सायंकाळी दुग्ध विकास विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. सायंकाळी अधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींनी त्यांच्याभोवती गराडा घातला. निकालाविषयी विचारणा केली.
अधिकाऱ्यांनी ७८९ प्राथमिक दूध संस्था अपात्र ठरविल्याचे सांगितले. शिवाय न्यायालयीन प्रक्रियेत समाविष्ठ असलेल्या ६७७ संस्थांचा निकाल प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर वैयक्तिक आणि संस्था पातळीवरील १४८, गोकुळ संघाचे ठेकेदार व कर्मचारी मिळून १२६ अशा २७४ संस्था पात्र ठरविले आहेत. दुसरीकडे मोठया संख्येने दूध संस्था अपात्र ठरल्यामुळे दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक बनले. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. काही प्रतिनिधींनी एकेरी भाषेचा उल्लेख केला. काही प्रतिनिधीनी कोर्टात दाद मागू असा इशारा दिला. कागल तालुक्यातील विकास पाटील कुरुकलीकर, अमजाई व्हरवडे येथील पांडूरंग पाटील यांनी दूध संस्थांच्या अपात्रतेवरुन अधिकाऱ्यांना प्रश्न केले. गोकुळच्या माजी संचालकांनीही दूध संस्थांच्या अपात्रतेवरुन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.