संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १० कोटींचा निधी : राजेश क्षीरसागर
schedule09 Aug 24 person by visibility 376 categoryराजकीय
दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करू : क्षीरसागर यांची माहिती*
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे. पण या वास्तूच्या पुन:उभारणी साठी तात्काळ रु.१० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
घटनास्थळी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनास दिल्या. घटनास्थळी उपस्थित राजेश क्षीरसागर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लॅडर, विमानतळ प्रशासनाचे अग्निशमन वाहन पाचारण केले.
या संपूर्ण घटनेची माहिती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली. मुख्यमंत्री शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. सरकारकडून १० कोटींची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे. अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देवून कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.