Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !

schedule16 Feb 26 person by visibility 198 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत  कुठे आघाडयांचे राजकारण तर कुठे महायुती म्हणून मित्रपक्षांनी निवडणुका लढविल्या. राज्य पातळीवर एकत्रित असलेले हे पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक तालुक्यात आमनेसामने उभे ठाकले. निकालानंतर आता महायुती म्हणून आम्ही सगळे मित्र पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करण्यासाठी सरसावले आहेत. दरम्यान निकालानंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत मोठा भाऊ कोण ? यावरुन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यामध्ये भाऊबंदकी सुरू झाली आहे. यामुळे अध्यक्षपदावरुन घासाघीस होणार अशी चिन्हे दिसत आहेत. मंत्री  हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा विषय आता प्रतिष्ठेचा ठरणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे महायुती म्हणून एकत्र लढले. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत एकवाक्यता दिसली नाही. महायुतीतील सगळयाच पक्षांनी तालुकानिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी रणनिती आखली. करवीर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते. या ठिकाणी शिवसेना  स्वतंत्र लढली. चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाले. त्या विरोधात भाजपचे आमदार शिवाजी पाटील लढले. कागलमध्ये राष्ट्रवादी व भाजप एकत्रित तर विरोधात शिवसेनेचे  प्रा. संजय मंडलिक यांची आघाडी. शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडी. त्या आघाडीला राष्ट्रवादीचे बळ. राज्य पातळीवर आमदार यड्रावकर हे शिवसेनेला पाठिंबा दिलेले. येथे अनेक मतदारसंघात भाजप व शाहू आघाडी आमनेसामने होते. जनसुराज्य पक्ष ही कुठे महायुतीसोबत तर कुठे स्वतंत्र लढला. भुदरगडमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात शिवशाहू आघाडी. शिवशाहू आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सहभागी. शाहूवाडीत शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आघाडी. तर पन्हाळा येथे जनसुराज्य विरोधात भाजप स्वतंंत्रपणे लढला. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र होते.

प्रत्येक मतदारसंघात सोयीची भूमिका घेत लढलेले महायुतीचे घटक पक्ष आता सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सर्वाधिक वीस जागा, भाजपाला बारा, शिवसेनेला नऊ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे पाच आणि पुरस्कृत अपक्ष उमेदवार एक असे एकूण सहा सदस्य आहेत. आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीचे चार सदस्य असे महायुती म्हणून मोट बांधली तर ५१ सदस्य होतात. राष्ट्रवादीने, ‘जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ’अशी बॅनरबाजी केली.राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे सर्वाधिक वीस सदसय असल्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल् असे जाहीर केले. ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य त्या पक्षाचा अध्यक्ष हे सूत्र त्यांनी जाहीर केले. महापालिकेतील सत्ता स्थापनेचा पॅटर्न दाखला देत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीलाच अध्यक्षपद हे त्यांनी ठासून सांगितले. दुसरीकडे महापालिकेत महापौर केल्यानंतर भाजपनेही जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावा केला. जिल्हा परिषदेत भाजप व मित्र पक्षांचे एकूण संख्याबळही त्यांनी मांडली. आणखी काही जणांना सोबत घेण्याचे संकेतही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य त्या पक्षाला अध्यक्षपद हे सूत्र असा पद वाटपाचा फॉर्म्युला असताना भाजपने अध्यक्षपदासाठी मांडलेले गणितही चकित करणारे आहे. यावरुन सहजासहजी राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळणार नाही  अशी चिन्हे दिसत आहेत. वाटाघाटीत अध्यक्षपदावर दावा करत वजनदार खाती पदरात पाडून घ्यायची अशी भाजपची निती असू शकते. दरम्यान अध्यक्षपदावरुन भाजप व राष्ट्रवादीकडून दावा सुरू झाल्यामुळे महायुतीत भाऊबंदकीचे नाट्य दिसत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes