सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान
schedule06 Jul 26 person by visibility 18 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्यावतीने २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आ सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तसेच कागल येथील प्रकल्प परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रशासक सागर बलकवडे म्हणाले, "सहकार ही केवळ संस्था चालविण्याची संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. सहकार सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेले उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सहकाराची मूल्ये अधिक मजबूत करण्यास मदत करतील. भविष्यातही गोकुळच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील."
सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर यांचे "सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. बदलत्या काळात सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रभावी व्यवस्थापन, संस्थेची कार्यपद्धती आणि कर्मचारी यांची भूमिका याविषयी त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच संस्था, सहकार आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक मजबूत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आनंद यादव, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉ.दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉ. विजय मगरे, उदय पाटील, भरत मोळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, उपस्थित होते.