पेटंटचे स्टार्टअपमध्ये रूपांतर होणे अत्यंत महत्वाचे – डॉ.मोहन वनरोट्टी
schedule18 Dec 25 person by visibility 238 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अनेक प्राध्यापक,विद्यार्थी आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून रिसर्च च्या माध्यमातून पेटंट मिळवतात.पण हे सर्व पेटंट हे कागदोपत्रात राहू नयेत तर या पेटंटच्या माध्यमातून स्टार्टप्सला चालना मिळावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्टार्टअप च्या माध्यमातून आपण रोजगाराच्या संधी तर निर्माण करूच पण आपल्या विद्यार्थ्यांसमोर,समाजासमोर उद्योजकतेचा आदर्श उभा करू’ असा विश्वास केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.
येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन वतीने पेटंट ओ थॉन या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेची अंतिम फेरी १७-२० डिसेंबर २५ या काळात महाविद्यालयात होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातील सहा राज्यातून जवळपास ९४ जणांनी स्वत;च्या पेटेंट बाबत तपशिल या स्पर्धेसाठी पाठवला. ऑनलाईन परीक्षणाच्या पहिल्या फेरीनंतर ४६ पेटेंटस हे या स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेसाठी ग्राह्य धरले गेले आहेत.या चार दिवसामध्ये सर्व स्पर्धकांना प्रत्यक्ष समोर येऊन आपल्या पेटेंट बाबत सादरीकरण करायचे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. वनरोट्टी यांच्या हस्ते झाले.
केआयटी आयआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी यांनी प्रास्ताविक केले. ही स्पर्धा चैतन्य रिसर्च अँड टेक्नोलॉजी, आय.पी.इंटलेक्ट सर्व्हिसेस,अॅक्युरस आय.पी.केअर यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या कार्यक्रमाला डी.एस.टी.निधी आय.टीबीआय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी,महाराष्ट्र सरकार यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या नियोजनात स्टार्ट अप्सचे इंक्युबेशन मॅनेजरचे समीर पुनस्कर, देवेंद्र पाठक ऋषिकेश दुधगावकर, संदीप लाड, पार्थ हजारे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले.