विवाह सोहळा नात्यापलीकडचा…निराधार लेकीच्या कन्यादानाचा
schedule18 Dec 25 person by visibility 78 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी अनोखा विवाह सोहळा रंगला. समाजातील मातब्बर मंडळी हा घरचा कार्यक्रम म्हणून समारंभात सामील झाले. विवाह सोहळयासाठी प्रत्येकाने एकेक जबाबदारी उचलली. कुणी मांडव उभारला. कुणी मंडप सजावट केली. कुणी संसार सेट भेट स्वरुपात दिला. कुणी वॉशिंग मशिन दिलं तर कुणी सागवानी बेड दिला. तर कुणी स्वत:ची मुलगी मानून पालकत्व स्वीकारात कन्यादान केलं. खरं तर, हा विवाह म्हणजे, नात्यापलीकडील नातेबंध जपणारा. माणुसकीचा नवा पूल जोडणारा अन् स्नेहबंध घट्ट करणारा समारंभ ठरला. निराधार लेकीच्या नव्या जीवनप्रवासाला शुभेच्छा देताना कोल्हापूरकरांनी दातृत्वाची प्रचिती घडविली.
अनाथ, निराधार मुलामुलींचे संगोपन करणारी संस्था म्हणजे बालकल्याण. निराधार मुलींच्या संगोपनासह शिक्षण आणि पुनर्वसनाकडे आवर्जून लक्ष दिले जाते. बालकल्याण संकुलसाठी तर हा विवाह सोहळा खास होता. कारण ही विशेष. संकुलमध्ये आतापर्यंत ७४ अनाथ, निराधार मुलींचे विवाह पार पडले आहेत. या मुलींना हक्काचं घर मिळालं. मायेची माणसे लाभली. बालकल्याणमध्ये मंगळवारी झालेला हा ७५ वा विवाह सोहळा. या अमृतमहोत्सवी लग्न समारंभाची गेले काही दिवस संकुलमध्ये लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मुहूर्तमेढ, हळदीचा विधी झाले.
बालकल्याण संकुलातील मुलगी पूजा हिची भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील विश्वजीत विजय पुजारी सोबत लग्नगाठ बांधली. विश्वजीत हा राज्य परिवहन महामंडळ, राधानगरी डेपो येथे सहायक मेकॅनिक आहे. तर पूजा ही बीए कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे. सोळा डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला. अक्षता पडताच, मांडवात पोलिस बँड, ताशा आणि हलगीच्या तालावर मुलांनी फेर धरला. साऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.
यानिमित्ताने संकुलाच्या दारात रांगोळया रेखाटल्या होत्या. मांडवात हलगीच्या तालावर मुले नाचत होती. संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कार्यवाह पदमजा तिवले, मानद कार्यवाह एस. एन. पाटील हे स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. लोकमतचे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी मुलीचे पालकत्व स्वीकारुन कन्यादान केले. ए वन डेकोरेशनचे निलेश चव्हाण यांनी मांडव आणि विद्युत रोषणाई केली होती.भास्कर भोसले यांनी स्टेज डेकोरेशन केले. पूनम प्रदीप कुंभार यांनी मंगळसूत्र केले. द्वारकादास शामकुमार यांच्याकडून वधू वरांसाठी लग्नबस्ता. योगिता व प्रवीण कोडोलीकर यांच्याकडून वॉशिग मशिन तर नामीदेवी अनिल कश्यप यांच्याकडून सागवानी बेड, आराम गादी कारखान्याकडून गादी सेट, सचिन ग्लास ट्रेडर्सकडून भांडी सेट, भारती मुद्रणालयाकडून विवाहपत्रिका, राजगोंडा शेटे यांच्याकडून मंडप सजावट साहित्य…प्रत्येकाने कर्तव्य भावनेने मदत केली.
या विवाह सोहळयात वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, व्यंकाप्पा भोसले, प्रदीप कापडिया, जयेश ओसवाल, बाबासाहेब देवकर, अॅड. अश्विनी खाडे, अॅड,. शिल्पा सुतार, सी. डी. तेली, सागर दाते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित वधूवरांना आशीर्वाद दिले.
.