धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा महामंडळाच्या कारभाऱ्यांना झटका ! जाहीर निवडणूक कार्यक्रम केले रद्द
schedule19 Sep 22 person by visibility 675 categoryसामाजिक
नव्याने कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या,अधिकाऱ्यांनी महामंडळातील कागदपत्रे घेतली ताब्यात
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : संचालक मंडळातंर्गत राजकारण, नियम व तरतुदींना फाटा देत नियुक्त झालेले दोन-दोन अध्यक्ष, दोन्ही बाजूच्या कारभाऱ्यांनी जाहीर केलेला स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम यामुळे चर्चेत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने झटका दिला आहे. कुरघोडीच्या राजकारणातून अध्यक्ष मेघराज भोसले व उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी जाहीर केलेले दोन्ही निवडणुकीचे कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाने रद्द केले. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी यासंबंधीचा आदेश सोमवारी काढला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक आसिफ शेख यांची तर निवडणूक नियंत्रक अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली.
येत्या सात दिवसात नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या आदेशामुळे महामंडळातील कारभाऱ्यांच्या मनमानीला चाप बसला अशा भावना सभासदातून उमटत आहेत.चित्रपट महामंडळ गेले काही महिने वादाने गाजत आहे. कार्यकारिणीत दोन गट पडले आहेत.
मेघराज भोसले यांच्याकडे चार संचालक आहेत. तर धनाजी यमकर, सुशांत शेलार, रणजित जाधव, सतीश रणदिवे, सतीश बीडकर, वर्षा उसगावकर यांच्यासह ९ संचालक एका बाजूला आहेत. ९ संचालकांनी एकत्र येत तीन महिन्यापूर्वी भोसले यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. आणि महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार यांची निवड केली. दरम्यान महामंडळाच्या घटनेत अध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची तरतूद नाही असे सांगत मेघराज भोसले यांनी मीच खरा अध्यक्ष असल्याचा दावा केला.
भोसले यांनी गेल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी नेमले. त्याला प्रतिउत्तर देताना उपाध्यक्ष यमकर यांनी भोसले यांनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असल्याचे सांगत पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
दोन गट, दोन अध्यक्ष आणि निवडणुकीचे दोन कार्यक्रम यामुळे पेच निर्माण झाला होता. महामंडळाच्या कामकाजाविषयी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी दाखल आहेत. धर्मादाय उपायुक्त चौधरी यांनी सोमवारी, नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. या आदेशाने कारभाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमांना ब्रेक बसला. धर्मादाय उपायुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी व नियंत्रक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केले. त्यांनी सोमवारी महामंडळाच्या कार्यालयातील सभासदांची यादी, प्रोसिडिंग ताब्यात घेतले.सात दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश आहेत.