कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अकरा जुलैला बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
schedule06 Jul 25 person by visibility 75 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध शैक्षणिक विषयांच्या सोडवणुकीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अकरा जुलै रोजी २०२५ बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक संघ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलनाची हाक दिली आहे. विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालय हॉलमध्ये बैठक झाली.
‘संच मान्यतेचा आदेश रद्द करावा’यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. शिक्षकांच्या पन्नास टक्के जागा रिक्त आहेत, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित केला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले,‘ पवित्र पोर्टलद्वारे होणारी भरती प्रक्रिया अपवित्र बनली आहे. विना मुलाखतीचा पर्याय ठेवूनही उमेदवार येत नाहीत. प्रतिक्षा यादी नसल्याने शिक्षकांच्या पन्नास टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. आताच सरकारच्या भूमिकेविरोधात जागे होण्याची वेळ आहे. अन्यथा शाळा सरकारी जमा होतील.’
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. कोल्हापुरातील आंदोलनाचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे.’ माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी शिक्षण व शाळा वाचविण्यासाठी प्राथमिक मराठी शाळा टिकल्या पाहिजेत.’असे सांगितले. शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील यांनी शिक्षक भरती बंद झाल्याचे दुष्परिणाम संस्थाचालक भोगत आहेत. शिक्षक कमी झाल्यामुळे शाळा कशा चालवल्या जात असतील ? यासंबंधी सरकार विचार करणार आहे की नाही ? ’असा सवाल केला. याप्रसंगी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, भैय्या माने, दत्तात्रय घुगरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य डी. आर. मोरे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, किसन कुराडे, श्रीराम साळुंखे, सी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते.