कोल्हापुरात दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा-मंत्री हसन मुश्रीफ
schedule05 Jul 25 person by visibility 41 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहत आहे. सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातही अनेक सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. यातून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यासाठी दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील आरोग्य संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. त्याचबरोबर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) नूतन अत्याधुनिक सेवा व सुविधांचाही लोकार्पण सोहळा पार पडला.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या मनोगतात कोल्हापूर ज्या प्रकारे बदलत आहे, त्याच प्रकारे सीपीआर रुग्णालयही बदलत असल्याचे सांगून, एवढ्या चांगल्या आरोग्य सुविधा रुग्णांसाठी उभ्या राहत असून, यातून कोल्हापूरची नवी ओळख ‘मेडिकल हब’ म्हणून निर्माण होईल, असे आश्वासन दिले. शासकीय रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही वेळी गुणवत्तापूर्वक सुविधा सर्वसामान्य रुग्णांसाठी मिळाव्यात, खाजगी रुग्णालयांऐवजी या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढावी, यासाठी आरोग्य क्षेत्रात अजून मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सत्यवान मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले. या कार्यक्रमात सीएसआरमार्फत दिलेल्या विविध सुविधांसाठी संबंधितांचा सन्मान करण्यात आला.
…………………………………