कळंबा ग्रामपंचायतीला उशिरा सुचलेले शहाणपण, तलाव वाचविण्यासाठी हवी कठोर भूमिका
schedule28 May 25 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खरं तर, कळंबा तलावातील पाणीसाठा हा पिण्यायोग्य. कळंबा, पाचगाव आणि कोल्हापुरातील काही भागांना तलावातून पाणी पुरवठा करण्याची वितरण प्रणाली आहे. मात्र याकडे कळंबा आणि पाचगाव या दोन्ही ग्रामपंचायतीसह कोल्हापूर महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष आहे. पाणलोट क्षेत्रात बांधकामे, केरकचरा, सांडपाणी मिसळणे यामुळे तलावाची वाट लावण्याचा उद्योग झपाटयाने सुरू असल्याचे चित्र आहे. तलाव परिसरातील बांधकामे, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना अटकाव केला नाही तर येत्या काही दिवसात कळंबा तलावाची अवस्था ही रंकाळा तलावासारखी होणार आहे. तलाव पाणलोट क्षेत्रातील व्यावसायिकांना कळंबा ग्रामपंचायतीने नोटीस लागू केल्या आहेत. प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेले व्यवसाय बंद करावेत असे कळविले आहे. कळंबा ग्रामपंचायतीचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, मात्र ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे.
वास्तविक कळंबा तलावाच्या स्वच्छता व संवर्धनासाठी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात उभारलेले व्यवसाय काही एका रात्रीत झाली नाहीत. हॉटेल, मंगलकार्यालय, चिकन विक्रेत्याच्या टपऱ्या, चहा विक्रेते, मूर्तीकार, दवाखाने, शेती फार्म असे सगळे व्यवसाय तलावाला लागून झाली आहेत. कळंबा-गारगोटी रोडचा दोन्ही कडील भागातून तलावात जलस्त्रोत येतात. मात्र बांधकाम करताना हे सगळे जलस्त्रोत अडविले आहेत. चुकीच्या पद्धतीने वळविले आहेत. तलावात मिसळणाऱ्या ओढयात सांडपाणी, खरकटे अन्न, कचरा टाकला जातो. टाकावू साहित्य खुलेआम टाकले जाते. याबद्दल कळंबा ग्रामपंचायतीने कधी कोणावर कारवाई केली नाही. हे सगळे व्यावसायिक, कोण आहेत हे कळंबा ग्रामपंचायतीला दिसले नाही का ?
कळंबा तलाव चौपाटीवरील काही भागात व्यावसायिकांनी बांधकाम साहित्य टाकले आहे. प्रदूषणकारी घटक सरळ ओढयात टाकतात. प्रदूषण टाळण्यासाठी कोणीही प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्याचे दिसत नाही. खराब साहित्य, मोडक्यतोडक्या मूर्ती, नासलेले अन्न, खरकटे, प्लास्टिकच्या पिशव्या या सगळयांची भर ओढ्यात पडत आहे. यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाले आहेत. हे कळंबा ग्रामपंचातच्या निदर्शनास कसे येत नाही ? नागरिकांनी अनेकदा तलावाच्या प्रदूषणासंबंधी तक्रारी केल्या. तलावात कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांना पकडून दिले. मात्र कळंबा ग्रामपंचायतीची कार्यवाही नोटीस काढण्यापलीकडे पोहोचत नाही.
………………….
पावसाळयापूर्वी तलाव परिसरात स्वच्छता मोहिम
कळंबा तलाव परिसरात चहूबाजूंनी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, टाकावू साहित्याची पोती पडली आहेत.मोठा पाऊस झाला का हा सगळा कचरा वाहत येऊन तलावात मिसळणार आहे.तलावाच्या प्रदूषणात भर पडणार आहे. यामुळे तलाव परिसरात चहूबाजूंनी स्वच्छता मोहिम राबविण्याची गरज आहे. पाचगावकडून कळंबा तलाव सांडव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर व तलाव क्षेत्रात तर प्लास्टिक पिशव्या, कचरा साचलेला आहे. तलावात सध्या पाणी कमी आहे. सांडव्यापासून कळंबा रस्त्यालगतच्या बागेपर्यत तलाव परिसरात प्लास्टिक पिशव्या, खराब कपडे टाकलेले आहेत. सांडवा लगतच्या रस्त्यावरुन दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता तर टाकावू साहित्यांनी भरला आहे.