शिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
schedule27 Jul 26 person by visibility 1600 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा लौकिक आहे . शिष्यवृत्ती परीक्षा, इतर शैक्षणिक उपक्रमात जिल्ह्याने नेहमीच अव्वल कामगिरी केली आहे. शैक्षणिक कामगिरी प्रतवारी निर्देशांकामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने सलग दोन वर्षे देशात अग्रस्थान पटकावले हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र त्याचवेळी गेल्या काही दिवसात शिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीने चर्चा व्हायला नको, याची खबरदारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेडकर यांनी घ्यावी.' अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना केल्या. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेमधील राजर्षी शाहू सभागृह येथे हा कार्यक्रम सोमवारी 27 जुलै 2026 रोजी झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षणमिती सभापती शितल यादव, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर , महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, आणि समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेमध्ये गेले काही दिवस पदोन्नती प्रकरण गाजत होते. काही शिक्षक संघटनाने थेट मंत्र्यांच्या पर्यंत तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने मंत्री मुश्रीफ यांनी सूचना केली.