खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलन
schedule27 Jul 26 person by visibility 55 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह चालविण्यासाठी खासगी कंपनीला देण्याला रंगकर्मीनी कडाडून विरोध केला. महापालिकेने तो निर्णय मागे घ्यावा यासाठी रंगकर्मीतर्फे २८ जुलै २०२६ रोजी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रंगकर्मीच्या बैठकीत हा निर्णय झाला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचे ठरले. या बैठकीत सर्वच रंगकर्मीनी नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध केला. अभिनेता आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, भरत दैनी, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण, सुनील घोरपडे, पद्माकर कापसे, मिलिंद अष्टेकर, पंडित कंदले, उमेश पोवार आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेनेही आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनी नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.