Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

जाहिरात

 

बंडोबा झाले थंडोबा…!

schedule09 Oct 26 person by visibility 440 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: ‘मला माझं भवितव्य अंधकारमय करायचं नाही, नशिब आजमावयचं आहे.’, ‘शिवसेनेच्या उमेदवार स्वतंत्र आहे. निवडणूक लढविणारच…’अशा गर्जना करत पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात बंडाची भाषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित करुनही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कोणी अपक्ष म्हणून तर कोणी पक्षाच्या मंत्री, आमदारांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. मात्र त्यांच्या उमेदवारी तीन ते चार दिवसच टिकल्या. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बंडोबा बनले थंडोबा अशा प्रतिक्रिया पदवीधर व शिक्षक मतदारांतून उमटत आहेत. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचाही निवडणुकीत माघार घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे  भैया माने, शिवसेनेचे मंगेश चिवटेंच्या माघारीची चर्चा अधिक आहे. पक्षाचा आदेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेतली असे स्पष्टीकरण संबंधितांनी दिले. दरम्यान माघार घेतलेल्या मंडळीत काेण नेत्यांच्या मर्जीतील होते तर कोण शिक्षक नेते म्हणवून घेत.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात महायुतीतंर्गत भाजपकडून कौस्तुभ गावडे तर पदवीधरमध्ये डॉ. स्मिता जाधव यांची उमेदवारी घोषित झाी आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर तर पदवीधरमधून हर्षदा देशमुख जाधव या उमेदवार आहेत. पदवीधरमध्ये एकूण ४७ उमेदवार तर शिक्षकमध्ये तीस उमेदवार  रिंगणात आहेत. दरम्यान महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू व समर्थक भैया माने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी पदवीधर निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. मोठया संख्येने मतदार नोंदणी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी तर ‘माने यांना आमदार करणार, गुलाल लावून नागपूरला घेऊन जाणार’अशा घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या होत्या. महायुतीमध्ये पदवीधर मतदारसंघ भाजपला मिळाला. मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीधर्म पाळणार असे स्पष्ट केले. यामुळे माने यांना मर्यादा पडल्या.

त्यांनी, मुश्रीफ यांना पत्र लिहित पदवीधरची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे घोषित केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडेडी चाचपणी केली. पुणे मुक्कामी काही हालचाली केल्या. अखेर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज दाखल करताना माने यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या शक्तीप्रदर्शनात राष्ट्रवादीचे कागल तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी ही पुढे होते. अर्ज भरुन कोल्हपुरात परतल्यानंतर माने व समर्थकांच्या राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. गेले दोन दिवस ते माघार घेणार अशी चर्चा होती. शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यामध्ये माघार घेण्याचे ठरले. माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.

शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणार म्हणून मंगेश चिवटे यांनी हवा तयार केली. जिल्हानिहाय शिक्षक, संस्थाचालकांचे मेळावे घेऊन पुरस्कार वाटप केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार ज्योती वाघमारे आमदार सुहास बाबर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशी मातब्बर मंडळी उपस्थित होती. शिवसेनेकडून मंगेश चिवटे लढणारच असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्मुलानुसार भाजपला उमेदवारी असल्यामुळे चिवटे यांना अखेर माघार घ्यावी लागली. चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू. शिक्षकमधील उमेदवारीचा दावा प्रबळ करण्यासाठी त्यांनी सगळया पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही भेटले होते. मात्र मैदानात उतरण्यापूर्वीच त्यांना तलवार म्यान करावी लागली.

…………..

शिक्षक मतदारसंघातून माघार घेतलेले अन्य उमेदवार….

माजी आमदार भगवानराव साळुंखे, सोलापूरच्या दिपाली अशोक वाघमोडे, आसुर्ले पोर्ले येथील करणसिंह सुरेशराव सरनोबत, कुर्डूवाडी येथील प्रथम काशिनाथ कोल्हे, कोल्हापुरातील दादासाहेब गणपती लाड, चंदगड तालुक्यातील कृष्णा महादेव गावडे, सोलापुरातील गणेश दामोदर नीळ, अंबवडे सातारा येथील रघुनाथ यशवंत जाधव, सांगली येथील बापू प्रदीप दाभाडे, राजेंद्र सुभाष नागरगोजे, अॅड. सम्राट विजयसिंह शिंदे, पुण्यातील अश्विनी नितीन कदम,हरिदास उत्तम चव्हाण, सुदर्शना रमेश त्रिगुणाईत, नंदकुमार पंढरीनाथ सागर, गोविंद भाऊसाहेब वाघ यांच्यासह १८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.

……………

पदवीधर मतदारसंघातून माघार घेतलेले अन्य उमेदवार…..

पुणे जिल्ह्यातील मनोजकुमार श्रीधर गायकवाड, महेश दशरथ म्हस्के, विनायक सुरेश रणभिसे, अथर अब्बास मोहम्मद हुसैन इनामदार, सुमित दत्तात्रय डुबल,अमोल नरहरी देवकाते, शिवाजी चंद्रकां खांडेकर, मिलिंद भरत संपगावकर,वनिता सोमनाथ देशकर,सचिन मधुकर बांगर, सातारा जिल्ह्यातील सागर शरद भिसे, सत्यवान विजय ओंबासे,  कोल्हापूर जिल्ह्यातील समीर माधवराव मोहिते, केरबा श्रीपती चौगले, सांगली जिल्ह्यातील दीपक भीमराव चव्हाण, प्रताप बाबासो माने, अरुण अंतु खरमाटे, सेवानिवृत्त शिक्षक एस. व्ही. पाटील, सोलापूर जिल्ह्यातील सिताराम विठठल रणदिवे, सुदर्शन मुरलीधर घेरडे, अमोल नरहरी देवकाते यांच्यासह २१ जणांनी माघार घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes