गोकुळच्या निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल, विरोधकांचा एकही संचालक निवडून येणार नाही-धनंजय महाडिक
schedule06 Mar 26 person by visibility 347 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणून एकत्र लढविणार आहोत. गोकुळची निवडणूकही महायुती म्हणून एकत्र लढवू आणि जिंकू ही. विरोधी काँग्रेस आघाडीचा एकही संचालक निवडून येणार नाही. विरोधकांच्या दबावाची तुम्हाला कसलीही चिंता करायची गरज नाही. ज्याच्या खिशात ठराव जास्त त्याची सदस्य संख्या जास्त या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पुढच्या या महिन्याभरामध्ये जास्तीत जास्त ठराव जमा करावेत. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत. गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून एकत्र लढली जाईल, ’ असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ‘ गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेस हाच शत्रू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळी रसद पुरवू, साम, दाम, दंड, भेद या साऱ्या नितीचा अवलंब करा’असे आवाहनही खासदार महाडिक व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी उपस्थितांना केले.
गोकुळच्या आगामी निवडणुकीसंदर्भात भाजपतर्फे प्राथमिक दूध संस्था, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नागाळा पार्क येथील कार्यालयात बैठक झाली. महाडिक यांनी प्रारंभी मुंबईतील बैठकीचा वृत्तांत सांगितला. मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीतील साऱ्या नेते मंडळीनी महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
महाडिक म्हणाले,‘गोकुळच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे आव्हान अजिबात वाटत नाही. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे, गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीलाच कौल मिळेल. तुम्हाला सगळ्या पद्धतीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सोबत धोका झाला.धोका कसा झाला, काय झालं आता त्याची चर्चा नको. मात्र यश मिळू शकलं नाही हा संघ आपल्या ताब्यातून विरोधकांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये प्राथमिक दूध संस्थांची संस्थांची परवड झाली. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, डिबेंचर्स फरकाची रक्कम, वासाचे दूध असे विविध विषय आहेत. आमच्या कार्यकाळात असले काही होणार नाही. राज्यात महायुतीची सत्ता आहे. दबावाचे राजकारण चालणार नाही. गाडया बंद करतो, ठेका बंद करतो असल्या धमक्या कोणी देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही.’असा सज्जड दमही भरला.
याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भाषणे झाली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गोकुळ ठराव प्रक्रियेची माहिती दिली. राजवर्धन निंबाळकर यांनी आभार मानले. या बैठकीला जिल्हयातील माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, शाहू ग्रुपचे प्रमुख समजितसिंह घाटगे, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, संजय पाटील, उमेश आपटे, रवीश पाटील- कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रविणसिंह पाटील, अशोक चराटी, प्रताप पाटील कावणेकर, मेघाराणी जाधव, शिवाजी बुवा, सुशीला पाटील, मेजर भिकाजी जाधव, दिलीप खाडे, रघु पाटील आदी उपस्थित होते.
…………….
महायुती म्हणून लढल्यास नेतृत्व भाजपाने करावे
गोकुळमध्ये गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून त्रास देण्याचे काम केले. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष म्हणून साथ दिली नाही. भाजपने गोकुळची निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी. महायुती म्हणून साऱ्यांनी एकत्र निवडणूक लढविल्यास त्याचे नेतृत्व भाजपकडे असावे अशा आक्रमक भाषेत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. कागलमध्ये ठरावाच्या कोऱ्या पत्रिका जमा करुन घेतल्या जातात. महायुतीतील काही नेते एकीकडे सत्तेचेही फायदे घेतात दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत.’अशा तक्रारही झाल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारभाराविषयी काही कार्यकर्त्यांनी उघडपणे तक्रारी केल्या.