हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!
schedule15 Sep 26 person by visibility 110 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : राज्य सरकार, महापालिका आणि जिल्हा परिषदेत महायुती म्हणून एकत्र असलेल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेत गोकुळ आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन शह, काटशह सुरू आहे. गोकुळ आणि पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. गोकुळमध्ये सभासद मतदारसंख्येवरुन त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे मिळून ३५०० मतदार असल्याचे सांगत भाजपाला बेदखल केले. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भैया माने यांच्या रुपाने अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडलाय, डिसेंबरमध्ये भैया माने यांना आमदार कररू असे सांगत निवडणुकीच्या मैदानात दोन हात करण्याचा इरादा स्पष्ट केला.
गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार असे मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे सारे सांगतात. दरम्यान गोकुळच्या अवसायानातील अपात्र संस्थेवरुन राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड कुरघोडीचे राजकारण रंगले. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई पोहोचली. अपात्र संस्थेमध्ये जादा तर संस्था या मंत्री मुश्रीफ समर्थकांच्या आहेत. न्यायालयीन लढाई असो की जिल्हा दुग्ध विकास विकास विभागाच्या कार्यालयात धडक मारणे असो प्रत्येक ठिकाणी मंत्री मुश्रीफ समर्थक आघाडीवर होते. गोकुळची अंतिम मतदार यादी जाहीर होणे आणि १४०० दूध संस्था मतदानास पात्र ठरल्यानंतर मंत्री मुश्रीफ हे आक्रमक बनले. त्यांनी निवडणूक महायुतीतर्फे लढवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढू असे सांगत असताना गोकुळच्या महायुतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य यांची बेरीज केली. या तीन पक्षाकडे ३५०० ठराव असल्याचा दावा करत ‘भाजप’ची गरज नाही दाखवून दिले. मंत्री मुश्रीफ यांच्या विधानाचा अर्थ शोधला तर गोकुळमध्ये ‘राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती’हीच महायुती…असा निघतो. त्यामध्ये भाजपचे स्थान किती हा प्रश्न शिल्लक आहे. जागा वाटपात भाजपची डाळ शिजू द्यायची नाही हेच त्यांनी दाखवून दिले. मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि जनसुराज्य अजून गप्प का ? की त्यांची संमती घेऊन मुश्रीफ बोलले ? असा सवाल भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यकडील सभासदांची ३५०० आकडेवारी मांडण्याअगोदर दोन दिवस आधी १४०० पात्र दूध संस्थांचा मेळावा कोल्हापुरात झाला. या मेळाव्यासाठी कोणी रसद पुरविली, संयोजक कुणाला जवळचे आहेत हे सर्वश्रृत आहे. या मेळाव्यात अपात्र दूध संस्थांनी, ‘अदृश्य शक्ती’ला सोबत घेऊ नका अशी जाहीर मागणी केली. अदृश्य शक्ती कोण ? हे उघड गुपित आहे. राज्य पातळीवर मुख्यमंत्री आणि जिल्हा पातळीवर भाजप आणि महाडिक म्हणजे अदृश्य शक्ती असे सगळेजण खासगीत बोलतात. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही अपात्र संस्थेवरुन भंडावून सोडले होते. दरम्यान भाजप विरोधकाकडून मुख्यमंत्री, भाजप आणि महाडिक यांचे थेट नाव न घेता अदृश्य शक्तीवरुन वातावरण निर्मिती झाली.
……..
पदवीधरसाठी राष्ट्रवादीचा सांगलीत मेळावा
पुणे पदवीधर मतदारसंघ महायुतीत कोणाला मिळणार हा सध्या चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीने सांगलीत मेळावा घेऊन पदवीधरसाठी दावा केला. मंत्री मुश्रीफ यांनी, गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. तेव्हा भाजपाने ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी विद्यमान आमदार अरुण लाड यांच्यासाठी भैया माने हे गेल्या निवडणुकीत थांबले होते अशी आठवण करुन दिली. दुसरीकडे भाजपाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून आमदार लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात दाखल करुन घेतले आहे. पदवीधरचे भाजपचे उमेदवार म्हणून शरद लाड असे चित्र निर्माण केले आहे. दुसरीकडे मंत्री मुश्रीफ यांनी, पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचा आमदार करणार असे सांगत भाजपसमोर शड्डू ठोकला आहे. पदवीधर मतदारसंघ हा भाजप विशेषता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. मंत्री पाटील हे दोन वेळेला पदवीधरमधून निवडणूक जिंकली होती. गेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता.