नगरसेवकांचा प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार, महापौरांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
schedule21 Feb 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतनिधी, कोल्हापूर : जवळपास सात वर्षानंतर झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नागरी प्रश्नांवरुन नूतन नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. अपुरा पाणी पुरवठा, कचरा उठावाची समस्या, भटक्या कुत्र्यांची समस्या, मोकाट जनावरे, खराब विद्युत दिवे, झूम येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प यावरुन नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. केवळ कागदी घोडे नाचविण्याऐवजी, ठोस कृती करा. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या संतप्त भावना विचारात घेत सभाध्यक्ष व महापौर रुपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. ‘प्रत्येक कामाचा कृतीबद्ध कार्यक्रम आखा. प्रश्नांची सोडवणूक करा. आणि ज्या अधिकाऱ्यांना काम जमणार नाही त्यांनी राजीनामा द्यावा.’असा सज्जड दम त्यांनी भरला. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची उपस्थिती होती.
महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित सभेत सिनीअर नगरसेवक आणि नूतन नगरसेवकांनी पायाभूत सुविधावरुन प्रशासनाचे लक्ष वेधले. विविध प्रश्नांची पोटतिडकीने मांडणी केली. दरम्यान या सभेत, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक येत्या वर्षभरात शिरोली नाका परिसरात उभे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच गुंठेवारी नियमतीकरणास वाढ हा ठराव मंजूर झाला.’ सभेत स्वीकृत नगरसेवक व अन्य समिती सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या. सभागृह नेतेपदी मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली.
सभेत, गुंठेवारीवरुन बोलताना शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी अधिकारी नागरिकांना भेटत नाहीत, कॅम्प लावत नाहीत असा आरोप केला अधिकाऱ्यांना बोल सुनावले. सभागृह नेते जाधव, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक सुभाष बुचडे या प्रश्नांवरुन कार्यवाहीच्या सूचना केल्या. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी बंद पथदिव्यांचा विषय मांडत विद्युत विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आदिल फरास यांनी शहरातील मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी कचरा प्रकल्पाच्या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा ऊहापोह केला. अपुरा पाणी पुरवठावरुन सदस्यांनी सभागृहात दोन तास चर्चा घडवून आणली.
नगरसेवक सत्यजीत जाधव, वैभव माने, स्वरुप कदम, विशाल शिराळे, माधुरी नकाते, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, नियाज खान, प्रताप जाधव, वैभव कुंभार, विजय खाडे पाटील, पल्लवी देसाई, अर्जुन माने, आश्किन आजरेकर, दीपाली घाटगे,नेहा तेंडुलकर, ऋतुराज क्षीरसागर, विजय देसाई, मानसी लोळगे, सचिन शेंडे आदींनी चर्चेत सहभाग घेत विविध विषयाकडे लक्ष वेधले. उपायुक्त् पारितोष कंकाळ, अधिकारी हर्षजीत घाटगे, विजय पाटील यांनी विभागामार्फत सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महापौर निकम यांनी, प्रत्येक आठवडयाला एका विभागाची बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना केल्या. सभेत कोल्हापूरची हद्दवाढ, तीर्थक्षेत्र विकास आराखडयासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.