फौन्ड्री उद्योगासह कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी दिल्लीत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार – खासदार प्रवीण खंडेलवाल
schedule20 Feb 26 person by visibility 137 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोणत्याही शहराचा विकास हा चौकटबद्ध स्थितीत होत नसतो. विकास साधायचा असेल तर विस्तार आवश्यक आहे. शहराची हद्दवाढ झाली तर केंद्र सरकारच्या विविध योजना, निधी मोठया प्रमाणात उपलब्ध होतात. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करू. तसेच कोल्हापूरच्या फौन्ड्री उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी लोकसभेतही आवाज उठवू’ अशी स्पष्ट ग्वाही दिल्लीचे खासदार व कान्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडसचे जनरल सेक्रेटरी प्रवीण खंडेलवाल यांनी दिली. या विषयांच्या सोडवणुकीसाठी कोल्हापुरातील खासदारांना सहकार्य राहील.’असेही खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे उद्योग व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या समारंभासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, दि महाराष्ट्र कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. येथील गायन समाज देवल क्लब येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार सुनित चिनुभाई परीख यांना, कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार श्रीमती नलिनी व्ही नेने यांना, कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार विवेक शिवरुद्र शेटे यांना., कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार-उद्योग पुरस्कार दुर्गेश बळवंत तोडकर, प्रताप भगवान पाटील यांना प्रदान करण्या आल. मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी नूतन नगरसेवक शारंगधर देशमुख, सत्यजीत जाधव, अर्जुन माने, प्रवीण सोनवणे, रत्नेश शिरोळकर यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार खंडेलवाल यांनी, कोल्हापूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक आहे. देशभरातील मोठया शहरासोबत कोल्हापूरची हवाई कनेक्टिव्हिटी तयार झाली पाहिजे. यासाठीही आपण मदत करायला तयार असल्याचे सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी आनंद माने, प्रदीप कापडिया, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, संपत पाटील, धनंजय दुग्गे, राहुल नष्टे, वैभव सावर्डेकर, अनिल धडाम, आदी उपस्थित होते.