पाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवर
schedule17 Jun 26 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर : शहरातील अपुरा पाणी पुरवठा, टँकरची कमतरता... नागरिकांना भेडसावणारी पाणी टंचाई यावरुन कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. सभेला प्रारंभ होताच नगरसेवकांनी पाणी टंचाईच्या प्रश्नावरुन आक्रमक झाले. सत्ताधारी आणि विरोधी आघाडी अशा दोन्ही बाकावरील नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. टँकरच्या उपलब्धतेवरुन प्रशासन फसवणूक करत आहे असा आरोप सभेत झाला. महापौर रुपाराणी निकम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त राजेंद्र भारुड यांनी नियोजनासंबंधी खुलासा केला. जलसंपदा विभागाची सातत्याने संपर्कात आहे. शिवाय पंपिंग स्टेशन येथून उपसा सुरू होत असल्याचे सांगितले, पण नगरसेवकांचे काही समाधान झाले नाही.
स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, वैभव माने, विजय देसाई, विजय खाडे, स्वरुप कदम, नियाज खान, माधुरी नकाते .. सत्ताधारी बाकावरील या नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. काँग्रेसचे नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, अमर समर्थ यांनीही पाणीपट्टीवरुन प्रशासनाला कोंडीत पकडले. नगरसेवक सुनील मोदी यांनीही टँकर बाबत विचारणा केली. महिला सदस्यांनी फलक झळकावित रोष व्यक्त केला. प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावरुन वाद घडत आहेत. चूक प्रशासनाची आणि संघर्ष नगरसेवकांना करावा लागत आहे. असे सदस्य म्हणाले. टँकरसाठी आता नगरसेवकांनी एकमेकांची डोकी फोडायची काय असा सवाल शारंगधर देशमुख यांनी केला. मुरलीधर जाधव यांनी प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याचे सांगितले.
सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नगरसेवकांनी प्रशासनाची बोलती बंद केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी, शहरातील पाणी टंचाईची भीषण स्थिती पाहून महापालिकेनेक कडक पावले उचलावीत. खासगी विहिरी बोअरवेल्स ताब्यात घेऊन शहरवासियांना पाणी पुरवठा करावा.’अशी सूचना केली. परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी सुद्धा पाण्याचे खाजगी स्त्रोत महापालिकेने ताब्यात घेऊन अशी सूचना केली. नगरसेवकांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र सभेत पाहावयास मिळाले. जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी ‘शहरवासियांना पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून आणखी जादा टँकर उपलब्ध करण्यात येत आहे. आजपासूनच शहरात एकूण वीस टँकरद्वारे पाणी पुरवठा करू.’असे सभागृहाला आश्वस्त केले. सभेत महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र प्रशासनाने सध्या त्यावर चर्चा नको. असे सांगत हा विषय लांबणीवर टाकला.
…………
‘पाणी टंचाईला सर्वस्व महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाचा आणि जलसंपदा विभागाचा समन्वय नाही. यामुळे नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली. काळम्मावाडी धरणाची गळती वेळेवर काढली नाही.’
- राजेश लाटकर, विरोधी पक्षनेता महापालिका