Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट- मंत्री हसन मुश्रीफमुंबईतील सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी पुन्हा गोकुळ तुपाची पसंती !राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!

जाहिरात

 

कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!

schedule12 Jun 25 person by visibility 412 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कानठळया बसविणाऱ्या ढगांचा गडगडाट, भीतीने गारठून टाकणाऱ्या वीजांचा कडकडाट,  ढगफुटीसदृश्य पावसामुळे जलमय बनलेले शहर, रस्त्यावरुन वाहणारे फूट-दीडफूट पाण्यामुळे गुरुवारी  (१२ जून २०२५) कोल्हापूरकरांना धडकी भरली. शहरातील अनेक भागात गुडघ्याभर पाण्यामुळे वाहतूक पूर्णत:कोलमडली. दुचाकी व चारचाकी वाहने पाण्यात अडकली.महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीसह विविध भागातील घरात आणि दुकानात पाणी शिरले. फेरीवाले, विक्रेत्यांची त्रेधातिरपिट उडाली.  दोन ठिकाणी वीज कोसळल्यामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली. ओढे-नाले भरुन वाहल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पसरले होते.  सरनोबतवाडी मणेर मळा येथील ओढयामध्ये शाळकरी मुलगा वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे. महापालिकेमार्फत मदत यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

दुपारनंतर ढगांनी दाटी केल्यामुळे शहर अंधारले होते. चारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट वाढला. कानठळया बसविणारा आवाज आणि धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे काही वेळ नागरिकही भयभीत झाले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली जवळपास पाऊणतास पाऊस कोसळत होता. काही मिनिटातच शहरातील सखल भागात पाणी साचले. गटारी, नाले भरुन वाहू लागले. बघता-बघता रस्त्यावर गुडघ्याभर पाणी पसरले. प्रचंड आवाजातील वीजांचे कडकडाट अस्वस्थ करत होते. न्यू शाहूपुरी येथील घोरपडे गल्लीतील मोकळया जागेत  व जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस मोकळया जागेत वीज कोसळली.

एव्हाना शहरातील अनेक रस्त्यांना नद्याचे स्वरुप लाभले होते. व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, जनता बझार चौक, साकोली कार्नर परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, गंगावेश, रंकाळा बसस्थानक परिसरसह विविध भागातील रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. ठिकठिकाणी पाण्यात वाहने अडकली. परीख पूल परिसरात पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक धोकादायक बनली. सायबर चौक ते एनसीसीपर्यंतचा रस्ता आणि राजाराम कॉलेजचे मुख्य प्रवेशद्वार ते सायबर चौकपर्यंतच्या रस्त्यावरुन प्रचंड पाणी वाहत होते.

महाद्वार रोड येथील व्यापाऱ्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला. रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. अनेक घरातही पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी हलविताना दमछाक झाली. लक्ष्मीपुरीतील लक्ष्मी रोडवरील पुस्तक दुकानांना फटका बसला. भांबुरे कापड दुकानात पाणी शिरले. उपनगरातही पावसाने दैना उडवली. पाचगावधील भैरवनाथ पार्क येथील घरामध्ये पाणी शिरले. शाहूपुरी कुंभार गल्लीही जलमय बनली. कारागिरांनी गणेशमूर्ती सुरक्षितस्थळी हलविल्या. जवळपास पाऊण तास पाऊस उसंत न घेता कोसळत होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes