छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटात
schedule03 Apr 26 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हाराफुलांनी सजविलेला रथ, आकर्षक रांगोळया, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जयघोष अशा उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांनी करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव पार पडला. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या रथोत्सवाचे आयोजन केले होते. मानकरी , सरदार घराण्याचे प्रतिनिधी , घोडे आणि शाही लवाजमा अशा थाटात रथोत्सव पार पडला.
सजावट केलेल्या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. खासदार शाहू महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती,मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. याप्रसंगी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते. भवानी मंडप येथून रात्री साडेआठ वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला.
मर्दानी प्रात्यक्षिके सादर करणारी बाल पथके आकर्षण ठरली. बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड येथे रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले . करवीर निवासिनी अंबाबाईच्या महाद्वारासमोर रथ येताच जय भवानी जय अंबामाता असा जयघोष करण्यात आला. गुजरी, भाऊसिंगजी रोड मार्गे पुन्हा भवानी मंडपात रथ पोहोचला. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करुन रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी ट्रस्टी ॲड. राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणील इंगळे, बाबा महाडिक, उदय घोरपडे, संजय पोवार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, सचिन चव्हाण, आदिल फरास, अमर समर्थ, वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, पैलवान विष्णू जोशीलकर, दिलीप सावंत, उपस्थित होते.
……………………………..