अमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेर
schedule20 Jun 26 person by visibility 97 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्या सीमाबांधवांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत सभास्थळापासून लांब नेले. यावेळी पोलिसांनी दोघा कार्यकर्त्यांकडून मोबाइलही काढून घेतले. दुपारी एक ते सव्वा एकच्या दरम्यान ही घटना घडली.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी राज्य सरकारकडून सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी गृहमंत्री शहा यांचा आग्रह होता. यानिमित्त कोल्हापुरात महायुतीतर्फे, शनिवारी २० जून २०२६ रोजी गृहमंत्री शहा यांचा सत्कार व जाहीर सभा आयोजित केली होती. पोलिस कवायत मैदान येथे सभा झाली. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठा पोलिस बंदोबस्त होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आशिष शेलार, खासदार धनजंय महाडिक, खासदार धैर्यशील माने, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार जयश्री जाधव, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजीत चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास उपस्थित होते.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गृहमंत्री शहा यांच्या भाषणाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत त्यांनी भाषणाला प्रारंभ केला. त्यांच्या भाषणाला प्रारंभ होऊन काही मिनिटे होताच सभास्थळी असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधले. ‘बेळगाव, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’अशा घोषणा सभास्थळी दिल्या. यावेळी पोलिसांनी, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांभोवती कडे केले. शिवाय तत्काळ त्या कार्यकर्त्यांना सभास्थळापासून काही अंतरावर नेले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, सीमाप्रश्नी आम्ही भावना मांडण्यासाठी आलो आहे. सभेत आम्ही काही गोंधळ घालणार नाही. गृहमंत्र्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे आहे असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्या साऱ्यांना ताब्यात घेतले. या साऱ्या प्रसंगाचे चित्रीकरण करणाऱ्या एकाचे मोबाइलही पोलिसांनी काढून घेतले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका कार्यकर्त्याकडूनही मोबाइल काढून घेतला. या प्रकाराबद्दल एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.