शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे
schedule10 May 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील (एस. व्ही. पाटील) तर उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे यांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक चंद्रकांत इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी, दहा मे २०२६ रोजी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. या दोघांच्या निवडी बिनविरोध झाल्या. नूतन अध्यक्ष पाटील हे करवीर तालुक्यातील आहेत. तर उपाध्यक्ष कांबळे हे गगनबावडा तालुक्यातील आहेत.
अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव संचालक राजेंद्रकुमार लहू पाटील यांनी सुचविले. संचालक गौतम तुकाराम वर्धन यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कांबळे यांचे नाव संचालक नंदकुमार तुकाराम वाईंगडे यांनी सुचविले. त्यास संचलक अर्जुन दिनकर पाटील यांनी अनुमोदन दिले. सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष पाटील यांनी, ‘बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व कर्जामध्ये वाढ व कर्ज व्याज दर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.’
या निवडीप्रसंगी संचालक बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, सुनिल एडके, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, वर्षा शरद केनवडे, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांची उपस्थिती होती. सुकाणू समितीचे सर्वश्री रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सभासद उपस्थित होते.