शक्तीपीठसाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलू, शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई : आमदार राजेश क्षीरसागर
schedule12 Jul 25 person by visibility 62 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवही महामार्ग समर्थनार्थ पुढे येत आहेत. कोणावरही अन्याय न होता शक्तीपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संदर्भात विरोधकांकडून केवळ राजकारणासाठी विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, वास्तवात अनेक शेतकऱ्यांचे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे. मुंबईला बैठकीसाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला मान्यता देऊन सातबारे देखील जमा केले आहेत. त्यामुळे विरोधकांनीही राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य द्यावे. महामार्गांच्या निर्मितीचा फायदा समृद्धी महामार्गातून दिसून आला आहे.
क्षीरसागर म्हणाले, ‘विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी ३०० मीटर नसून केवळ १०० ते ११० मीटर एवढीच असणार आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची वाहन आणि बैलगाड्या यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असणार आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत दिली जाणार आहे. २०१९ आणि २१ च्या पुराचा अनुभव घेऊन सध्या वाढवण्यात येणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढणार आहे असे समजून संपूर्ण रस्त्यावर जिथे पूरबाधित क्षेत्र होते, तिथे भराव न टाकता पिलर वर पूल बांधण्यात येतील. ब वर्ग जमिनी, देवस्थानच्या जमिनी, पतसंस्थांच्या जमिनी या जमिनीत कसणाऱ्याला कुठलंही नुकसान न होऊ देता त्याचं वर्गीकरण करून त्याला योग्य तो मोबदला दिला जाईल. एमआयडीसीच्या प्रत्येक झोन मध्ये ज्या प्रकारे कायदा आहे त्या प्रकारे त्यांना योग्य दर जाणार आहे.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगार्डे, नवनाथ पाटील, अमोल मगदूम, सचिन लंबे, रोहित बाणदार, राम अकोळकर, दत्तात्रय कुलकर्णी, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.