डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाला क्यूएस आय-गेज डायमंड मानांकन
schedule12 Jul 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ‘क्यूएस आय-गेज’ आंतरराष्ट्रीय मानांकनात डायमंड श्रेणी प्राप्त केली. देशातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात हे मानाकन मिळवले आहे. गतवर्षी ‘नॅकचे ए++’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त केल्यानंतर ‘क्यूएस आय-गेज’ हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाल्याने विद्यापीठाच्या गुणवत्तेवर आंतरराष्टीय मोहोर उमटली असल्याचे प्रतिपादन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.
क्यूएस अर्थात क्वाक्वारेली सायमंड्स ही लंडनस्थित संस्था आहे. ही संस्था दरवर्षी प्रकाशित करत असलेली ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ ही जगातील सर्वाधिक विश्वासार्ह व मान्यताप्राप्त विद्यापीठ क्रमवारी म्हणून ओळखली जाते. याच संस्थेकडून भारतातील उच्च शिक्षण संस्थांसाठी दिले जणारे ‘क्यूएस-आयगेज’ मानांकन पहिल्यात प्रयत्नात मिळवण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला यश आले आहे. लंडन येथील मुख्यालयाकडून हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे. २४ जुलै रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रदान केले जाणार आहे.
‘क्यूएस’ संस्थेमार्फत विविध आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विद्यापीठांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये सर्वच विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे. या मूल्यांकनात अध्यापन आणि शिक्षण, सामाजिक जबाबदारी, शासन व्यवस्था आणि रचना या तीन विभागामध्ये विद्यापीठाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्लॅटीनम तर प्राध्यापक गुणवत्ता, रोजगारयोग्यता आणि सुविधा या विभागांमध्ये डायमंड मानांकन मिळाले आहे.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ‘क्यूएस आय-गेज’ मानांकनाबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला. डॉ. पाटील म्हणाले, या मानांकनामुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रातही विद्यापीठाने नाव कोरले आहे. विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या मेहनतीचे हे यश असून याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.
विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘विद्यापीठाला मिळालेला क्यूएस आय-गेज मानांकन हा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या आमच्या धोरणाचा सन्मान आहे. भविष्यातही जागतिक स्तरावर उत्कृष्टता टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाने क्यूएस आय-गेज मानांकन मिळवणे ही आमच्या शैक्षणिक गुणवत्ता व जागतिक दृष्टिकोनाची पावती आहे.
आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा म्हणाल्या, विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेत सातत्याने पारदर्शकता आणि उत्कृष्टता ठेवली जाते. क्यूएस आय-गेज मानांकन हे आमच्या गुणवत्ता धोरणांची परिणामकारकता अधोरेखित करते.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. उमारणी जे , डॉ. अजित पाटील, डॉ. अमृत कुवर रायजादे, रुधीर बारदेस्कर, संजय जाधव आदी उपस्थित होते.