तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार कार्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
schedule12 Jul 25 person by visibility 55 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कार्य व विचारविश्व ' या विषयावर १६ व १७ जुलै २०२५ या कालावधीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र होत आहे. ही माहिती परिषदेचे समन्वयक गांधी अभ्यास केंद्राचे डॉ. प्रकाश पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे यांनी दिली आहे.
अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी यांच्या हस्ते १६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक खंडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या बीजभाषणाने चर्चासत्राला प्रारंभ होईल. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे १७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता विशेष सत्रात मार्गदर्शन होईल.
उद्घाटनानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांची मराठी विभागाचे प्रमुख डॉ . नंदकुमार मोरे आणि विचारशलाका नियतकालिकाचे संपादक डॉ. नागोराव कुंभार विशेष मुलाखत घेतील. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार व कार्याच्या अनुषंगाने विविध नऊ सत्रांमध्ये चर्चा करण्यात येईल. अनेक दिग्गज तज्ज्ञ व अभ्यासक या अंतर्गत मांडणी करतील. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप करंबेळकर, प्रा. राजा दीक्षित, डॉ. रणधीर शिंदे, सरफराज अहमद, डॉ. श्रीराम पवार डॉ. कौतिकराव ठाले-पाटील, 'साधना'चे संपादक विनोद शिरसाट, प्रख्यात गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, श्रीनिवास हेमाडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ विचारवंत अशोक राणा, सरोजा भाटे,आदी सहभागी होणार आहेत.
या चर्चासत्राच्या निमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पुस्तके, छायाचित्रे आणि चित्रफिती यांचे विशेष प्रदर्शनही राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. तर्कतीर्थांविषयीच्या शोधनिबंधांचे विशेष सत्रही आयोजिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. तरी या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.