व्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा
schedule07 Sep 24 person by visibility 344 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशाचा आणि कागल तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी नेहमीच द्वेष आणि मत्सर केला आहे. त्यामुळेच ते कागलच्या सभेत नको ते बरळले. त्यांच्या त्या वक्तव्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करीत आहोत,’ असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मुश्रीफ समर्थक जिल्हा बँक संचालक प्रताप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरूकलीकर, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कागलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांचे नाव घेत टीका केली होती. त्याला उत्तर देताना मुश्रीफ समर्थकांनी म्हटले आहे, ‘ वास्तविक ज्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद व्ही. बी. पाटील यांनी भूषविले आहे, त्या बँकेवर राजकीय स्वार्थापोटी खोटे आणि गलिच्छ आरोप करताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती. राजकीय द्वेषातून त्यांनी बँकेवर केलेले आरोप सिद्ध करावेत. अन्यथा; त्यांच्यावर मोर्चाही काढू.’
पत्रकात म्हटले आहे, ‘व्ही. बी. यांच्या द्वेष आणि मत्सराच्या राजकारणामुळे त्यांनी माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या पराभवाच्या रूपाने कागल तालुक्याची खासदारकीही घालवली. त्यांनीच शरद पवार यांना सांगून मंडलिक यांच्या विरोधात उमेदवारीचे षडयंत्र रचून आणले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही सगळे षड्यंत्र रचले नसते तर कागलची खासदारकी कागलमध्येच राहिली असती. हिम्मत असेल तर व्ही. बी. यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातून निवडणूक लढवावी. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढा आणि तुमची लायकी सिद्ध करा.’